मुंबई - श्वसननलिकेत दूध अडकल्याने अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याने आईच्या मांडीवर प्राण सोडला. नातवाच्या मृत्यूचा धक्का आजोबा पचवू शकले नाहीत. हृदयविकाराच्या झटक्याने तेही गेले. लागोपाठ दोन आघातांनी शहा कुटुंब कोलमडून गेले. मात्र, हाश्वीच्या आगमनाने पुन्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. नियतीला मात्र हे मान्य नसावे. म्हणूनच आठ महिन्यांचे बाळ आणि त्यापाठोपाठ वडील यांच्या अकाली जाण्याने खचून गेलेल्या आणि मानसिक तणावात असलेल्या मनालीने अवघ्या ३९ दिवसांच्या हाश्वीला १४व्या मजल्यावरून फेकून दिले. आई माझे काय चुकले, हाच कदाचित त्या निष्पाप जिवाचा अखेरचा प्रश्न असावा...
मुलुंड पोलिस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक राणी बाळू कुताळ (३३) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मनाली मेहता या महिलेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. गुरुवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी मुलुंड येथील नीळकंठ तीर्थ इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून फेकून देत मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. मुलीचे मामा जेनिल शहा (३५) यांनी दिलेल्या जबाबानुसार, बहीण मनालीचा नोव्हेंबर २०२० रोजी संकितसोबत विवाह झाला. दोघेही जन्मापासून मूकबधिर आहेत. विवाहानंतर मनाली सुरत येथे राहण्यास गेली.
‘ती’ त्यांचीच भाची निघाली...गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ओरडण्याचा आवाज आला. आईकडून बाळ गायब असल्याचे समजले. घरात शोध घेतला, मात्र हाश्वी सापडली नाही. काही वेळाने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने योगेश बिल्डिंगच्या आवारात एक लहान बाळ पडल्याचे सांगितले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता ती आपलीच भाची असल्याचे समजताच जेनिल शहा यांना धक्का बसला. मुलाचे निधन झाल्याच्या तणावात वडिलांचेही निधन झाले त्यामुळे मनाली तणावात होती. यातूनच तिने बाळाला फेकल्याचा संशय त्यांनी वर्तवला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिस अधिक तपास करत आहेत.
पुत्ररत्न प्राप्तीचा आनंद अल्पकाळ टिकला नोव्हेंबर, २०२१ मध्ये तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु जुलै, २०२२ मध्ये त्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. तान्हुल्याचा मनालीचे वडील विनय शहा यांना लळा होता. मात्र, त्याच्या अचानक जाण्याने विनय शहा खचून गेले. त्यातच त्यांचा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तेव्हापासून मनाली मानसिक तणावात होती.