राजगुरुनगर : बँकेतून काढलेली एक लाख रुपयांची रोकड चोरट्याने पळवली खरी; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत चोरटाही सापडला आणि रोकडही हस्तगत झाली. अवघ्या दोन तासांत या घटनेचा छडा लावून आरोपीस अटक करण्याची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे.खेडचे पोलीस निरीक्षक यांनी दिलेली माहिती अशी, राजगुरुनगरमधील नेहरू चौकातील दुकान मालकाने आपला कामगार दीपक वासुदेव खोले याना धनादेश देऊन बँकेतून पैसे आणण्यास सांगितले. पैसे आणताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी खोले थांबले. त्यावेळी एक लाख रोकड असलेली थैलीत्यांनी कोणास लक्षात येणार नाही अशी ठेवली. मात्र पाळत ठेवून असणाऱ्याने ती पिशवी घेऊन कोणाच्याही लक्षात न येऊ देतापळ काढला. पैशाची पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत पोलीस ठाण्यात गणेश दीपक तिवाटणे यांनी खेड पोलिसात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने याबाबत घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस यंत्रणा आणि तक्रारदारांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मग काढण्यात आला. सीसीटीव्हीमधील फुटेज पाहून संशयावरून नंदन बिलोसराम गुजर (वय २०, सध्या रा. थिगळस्थळ, मूळ ब्यासनगर, इंदूर) यास ताब्यात घेतले. पोलिसीखाक्या दाखवला असता नंदन गुजरने गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेली रोकडही पोलिसांनी हस्तगत केली. अवघ्या दोन तासांत हे तपासनाट्य पोलिसांनी पार पाडून कौतुकास्पद कामगिरी केली.सावधान! भुरट्या चोरांची टोळी सक्रिय...दोन दिवसांपूर्वी चांडोली येथेही स्कुटीच्या डिकीतून पाळत ठेवून पावणेपाच लाख चोरट्यांनी पळवले हिते. आठवडे बाजार आणि इतर वेळीही या भुरट्या चोरांकडून मोबाईल, रोकड, बॅग, चेन स्नॅचिंग असे प्रकार वारंवार घडत आहेत. याबाबत पोलीस लक्ष ठेवून असले तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी केले आहे.
अवघ्या दोन तासांत चोरटा जेरबंद; खेड पोलिसांची कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 12:57 AM