पोट दुखण्याचा बहाणा करुन बालसुधारगृहातून पलायन केलेला अल्पवयीन चोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 04:34 PM2021-03-11T16:34:36+5:302021-03-11T16:38:00+5:30
Juvenile thief who escaped from child remand home : चोरीच्या दुचाकी हस्तगत : मध्यप्रदेशातून केले पलायन
जळगाव : पोट दुखण्याचा बहाणा करुन मध्य प्रदेशातील बालसुधारगृहातून पलायन केलेल्या अल्पवयीन अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी चोपड्यातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून धरणगाव व एरंडोल येथून चोरी केलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आलेल्या आहेत.घरफोडी व दुचाकी चोरीत हा अट्टल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला आता जळगाव शहरातील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
संशयित अल्पवयीन चोरट्याला मध्य प्रदेश पोलिसांनी घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते. तेथील मुद्देमाल हस्तगत केल्यानंतर त्याला तेथी बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. तेथे पोट दुखत असल्याचा बहाणा करुन त्याने तेथून पलायन केले होते. याबाबत मध्य प्रदेशातील कोतवाली झाबुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्याने पलायन केल्यामुळे तेथील दोन पोलिसांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळली होती. दरम्यान, एरंडोल व धरणगाव येथील चोरलेल्या दोन दुचाकी चोपड्यात आलेल्या अल्पवयीन मुलाकडे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अशरफ शेख यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी अशरफ शेख, दीपक शिंदे, इद्रीस पठाण व भारत पाटील यांचे पथक रवाना केले होते. या पथकाने या चोरट्याला मिळालेल्या माहितीच्या ठिकाणावरुनच ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक दुचाकी होती, अधिकच्या चौकशीत आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुली देत दोन्ही दुचाकी काढून दिल्या. त्याशिवाय शिरपूर व धुळे येथेही घरफोडी व दुचाकी चोरी केल्याची कबुली त्याने दिली.