अकोला : शिवणी येथील रहिवासी असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला राज्य स्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळण्याचे आमिष देऊन कबड्डी कोचने तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ही अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने तिने एका मुलीला जन्म दिला असून, या प्रकरणी तिनेच दिलेल्या तक्रारीवरून कोचविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवणी परिसरातील एका महिला कबड्डी संघातील कबड्डी खेळाडूंना शिवणी परिसरातीलच रहिवासी असलेला शुद्धोधन सहदेव अंभोरे प्रशिक्षण देत होता. या कबड्डी संघात १५ ते २० मुली असून, या मुलींना गत एक वर्षापासून हा कोच प्रशिक्षण द्यायचा. दरम्यान, १० महिन्यांपूर्वी त्याने शिवणीतील एका अल्पवयीन १७ वर्षांच्या मुलीला राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळण्याचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण केले. गत वर्षभरापासून त्याने या मुलीवर सतत बलात्कार केल्याने मुलगी गर्भवती झाली. तिला काही कळायच्या आतच गर्भ चार महिन्यांच्यावर झाला होता. त्यामुळे तिच्यावर मातृत्व लादले गेले, सोमवारी पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर पीडित मुलीने कोच शुद्धोधन अंभोरे याला माहिती दिली असता, त्याने बाळ त्याचे नसल्याचे सांगितले. त्यामुळे विश्वासघात झालेल्या या मुलीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीविरुद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आरोपीस तातडीने अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार किशोर शेळके यांनी केली.एका अल्पवयीन मुलीला कोचनेच राज्य स्तरावर कबड्डी खेळण्याचे आमिष दिले. त्यानंतर मुलीवर सतत शारीरिक छळ केला. तिला पोलिस तक्रार करण्यापासूनही या आरोपीने रोखले. मात्र, तिने तक्रार देताच या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीस अटक करण्यात आली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण झाले का, या दिशेनेही तपास करण्यात येणार आहे.किशोर शेळके,ठाणेदार, एमआयडीसी पोलीस स्टेशन, अकोला.