लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हप्तावसुली, फसवणूक, जमिनीवर अवैध कब्जा करणे, गुंडांची टोळी चालविणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिवसेना शहर प्रमुख मंगेश कडव याच्यासमोर नेत्यांचीसुद्धा चालत नव्हती. त्याने शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या नाकासमोर मुंबईत अनेक व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावला. मुंबईच्या वांद्रा पोलीस ठाण्यात २५ लाखांच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. एका वर्षापूर्वी दाखल असलेल्या या प्रकरणात आतापर्यंत कडवला अटक केली नाही.मंगेश कडव याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हुडकेश्वरच्या प्रकरणात पत्नी रुचिता हिला आरोपी बनविण्यात आले आहे. वांद्रा पोलीस ठाण्यात कडव याने ९४ वर्षीय प्रभुदास लोटिया यांची फसवणूक केली आहे. लोटिया यांचे वांद्रे येथे रंगशारदा प्रतिष्ठानद्वारे संचालित हॉटेल आहे. म्हाडाद्वारे त्यांनी ९० वर्षाच्या लीजवर जमीन घेऊन हॉटेल बनविले. लोटिया यांनी ३० वर्ष लीज वाढवून देण्यासंदर्भात अर्ज केला होता. म्हाडाचे अधिकारी लीज वाढवून देण्यास टाळाटाळ करीत होते. दरम्यान, वांद्रे येथील शिवसेना नगरसेवक सुदेश डुबे यांनी लोटिया यांच्याशी मंगेश कडव याची ओळख करून दिली. कडव याने दोन महिन्यात काम करून देतो, असे सांगून २५ लाख रुपये मागितले. १४ मार्च २०१८ व १२ एप्रिल २०१८ मध्ये लोटिया यांनी कडव याला चेक व रोख स्वरूपात २५ लाख रुपये दिले. दोन महिने लोटल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांना संशय आला. कडव पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांची मुलगी पौर्णिमा शाह नागपुरात आली. त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांच्या मदतीने कडववर पैसे परत करण्यासाठी दबाव वाढविला. कडव याने पौणिमा यांना ५ लाखाचे ५ चेक दिले. ते चेकसुद्धा बाऊन्स झाले. वयोवृद्ध लोटिया हे शिवसेनेच्या जुन्या पिढीतील नेत्यांशी जुळलेले आहेत. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांकडून वसुली होऊ न शकल्याने लोटिया यांनी २० नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबई पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल केली. कारवाई न झाल्यामुळे २० फेब्रुवारी २०१९ मध्ये पुन्हा तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी १ एप्रिल २०१९ रोजी वांद्रा पोलिसात कडव याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.मुंबई पोलिसांनी कडवला अटक करण्यात गंभीरता दाखविली नाही. मुंबई पोलीस नागपुरात आले आणि खाली हात परत गेले. दरम्यान, कडव याने न्यायालयातून जामीन मिळविला. लोटिया यांनी त्याचा विरोध केला, पण अजूनही निर्णय न्यायालयात अडकला आहे.कडव याने मुंबर्ईच्या व्यापाºयांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. तो दोन महिने लोटियांच्या हॉटेलमध्ये थांबला होता. या दरम्यान त्याच्याकडे सेटिंग करणारे येत होते. कडव याच्यावर हॉटेलच्या जेवणाचे व भाड्याचे किमान ४ लाख रुपये आहेत.
कुणीच मदत केली नाहीप्रभुदास लोटिया यांची मुलगी पौर्णिमा यांनी लोकमतला सांगितले की, सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता, शिवसेनेचा नेता त्यांची फसवणूक करू शकतो. त्यामुळे आम्ही सेनेच्या काही दिग्गज नेत्यांशी प्रत्यक्ष भेटून अथवा संपर्क सूत्राच्या माध्यमातून तक्रार केली. नेत्यांनी कडवला सुनावलेसुद्धा. पण त्याचा काही परिणाम झाला नाही. कुणीही मदत न केल्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून केवळ खानापूर्ती केली.
अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाहीकडव हा शहरातच लपला असल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा त्याचा तीन दिवसांपासून शोध घेत आहे. कडवला माहिती आहे की, पोलिसांच्या हाती लागल्यावर त्याला कारागृहात जावे लागणार आहे. त्यामुळे तो आपल्या संपत्तीची हिशेबाने विल्हेवाट लावत आहे.