हरयाणातील कैथल येथे एक पोलिसांच्या तत्परतेनं एका महिलेचा जीव वाचला आहे. कैथल येथील ८ वर्षांच्या मुलानं पोलिसांना ११२ क्रमांकावर फोन करत घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि पोलिसांनीही तातडीनं त्याची दखल घेत ९ मिनिटांत दाखल होत महिलेचे प्राण वाचवले. यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानही करण्यात आला.
२४ मार्च रोजी वाहन क्र. ३८७ वर तैनात एसआय शमशेर सिंग, एचसी विनोद कुमार आणि एसपीओ जोरा सिंग यांना ११२ या क्रमांकावर एक फोन. एक महिला डिफेन्स कॉलनी, कैथलमधील तिच्या घरात गळफास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात सांगण्यात आलं. या माहितीद्वारे तातडीने आणि तत्परतेने कारवाई करत ईआरव्हीवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडीतून बाहेर पडत अवघ्या ९ मिनिटांत घटनास्थळी पोहोचत महिलेचे प्राण वाचवले.
घटनास्थळी पोहोचलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी आणि आसपासच्या नागरिकांनी डायल ११२ प्रकल्पाचं कौतुक केलं आणि इतक्या लवकर महिलेपर्यंत पोहोचून तिचे प्राण वाचवल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. महिलेचे प्राण वाचवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत एसपी मकसूद अहमद यांनी त्यांच्या कार्यालयात रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला.
अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनीही अशा प्रकारे आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून प्रेरणा घेतली पाहिजे. आपले कर्तव्य निष्ठेने व प्रामाणिकपणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यापुढील काळातही सातत्यानं गौरवण्यात येईल, अशी माहिती एसपी मकसूद अहमद यांनी दिली.
काय घडलं होतं?दरम्यान, त्या महिलेचं आपल्या पतीशी भांडण झालं होतं. त्यानंतर त्याच दिवशी मुलानं ११२ क्रमांकावर फोन करत आपली आई गळफास लावून घेत असल्याचं सांगितलं. यानंतर केवळ ९ मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेची समजूत काढता हा प्रकार थांबवला.