जळगाव : कजगाव, ता. भडगाव येथील भूषण नामदेव पाटील या तरुणाने गावातील बस स्थानकाच्या अवतीभोवती असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्याला वाचवले. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, एसटी महामंडळाचे अधिकारी दिलीप बंजारा यांनी त्या तरुणाचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याची समजूत काढली.
कजगाव येथे ग्रामपंचायतीच्या जागेत बस थांबा बांधण्यात आला आहे. त्याच्या अवती भोवती अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण काढले जावे, असा अर्ज भूषण पाटील याने गटविकास अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर २७ एप्रिल रोजी त्याने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेकडे अर्ज केला. त्यावर कारवाई न झाल्याने ४ जुलै रोजी त्याने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही हे अतिक्रमण कायम राहिल्याने त्याने शुक्रवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
हे अतिक्रमण काढण्यासाठी जागेची मोजणी करणे आवश्यक ठरणार आहे. त्यासाठीचा अर्ज भूमिअभिलेख विभागाला करण्यात आला आहे. त्यात नियमानुसार मोजणी केली जाणार आहे.