कल्याण - उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या सनम करोटीया या ३० वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी मार्केट) आवारात घडली. भरदिवसा घडलेल्या घटनेने कल्याणात खळबळ उडाली आहे. हत्या करून हल्लेखोर पळून गेले होते. मात्र,अवघ्या तासाभरातच पोलिसांनी बाबू धकनी याला अटक केली आहे. दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत असून मारेकरी हे उल्हासनगरमधील असून एकमेकांच्या परिचयाचे होते. मात्र, हा हल्ला नेमका कशातून झाला, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. याप्रकरणी कल्याणचे बाजारपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
एपीएमसी मार्केटच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर येथे राहणारी सनम करोटिया ही आपल्या दुचाकीवरून आपल्या मित्रंना भेटण्यासाठी आली होती त्यावेळी दोन तरूण दुचाकीवरून त्याठिकाणी आले. ज्याठिकाणी सनम उभी होती त्या ठिकाणी त्यांनी आपली दुचाकी उभी केली. सनम आणि दोघा तरूणांमध्ये जोरदार वाद झाला. यात दोघांपैकी एक तरु ण दुचाकीवरून खाली उतरला व त्याने तीच्यावर चाकूने सपासप वार केले आणि तो आपल्या सहका-यासह पसार झाला. सनम रक्ताच्या थारोळयात पडलेली पाहून परिसरात असलेल्या नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तीला नजीकच्या खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली. पोलिसांनी एपीएमसी मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे आणि पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही घटनास्थळी धाव घेतली. सनमच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीमधून मोबाईल सापडल्यावर त्या मोबाईल वरून आरोपी कोण याचा सुगावा पोलिसांना लागला. तासभरात पोलिसांनी बाबू ढकणी या हल्लेखोराला अटक केली त्याचा साथीदाराचा शोध सुरू आहे ही महिला आणि आरोपी बाबू एकमेकांना ब-याच वर्षांपासून ओळखतात अशी माहीती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. सनमला एपीएमसी मार्केटमध्ये कुणी बोलावून घेतले होते? बाबू आणि त्याचा साथीदार तिकडे कसा पोहचला आणि तिची हत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत.