मुंबई - गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा प्रकार बुधवारी कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतले आहे.निहाल वासवानी (६) असे मयत मुलाचे नाव आहे. कांदिवली पश्चिमच्या महावीरनगरमध्ये वीणासंतूर इमारत आहे. या इमारतीमध्ये बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत हायड्रोक्लोरीक पार्किंग आहे. एक कार धुवून झाल्यानंतर इमारतीचा सुरक्षारक्षक ती गाडी हायड्रोक्लोरिक रॅम्पवरून चढवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तितक्यात तो रॅम्पच खाली कोसळला. त्यावेळी सोसायटीमधील काही मुले त्याठिकाणी खेळत होती. त्यात निहालचा देखील समावेश होता. या रॅम्प कोसळला तेव्हा निहाल त्याखाली चिरडला आणि गंभीर जखमी झाला. त्याला नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात हलविले. 'निहालला रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरने त्याला तपासले आणि मयत घोषित केले', अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंडकुले यांनी दिली. निहालचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करत सध्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र हायड्रोलीक रॅम्प नेमका कशामुळे खाली कोसळला याबाबत चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. निहालच्या मृत्युमुळे अख्खी सोसायटी हळहळली असुन त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.