सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी कंगना राणौतने (Kangana Ranaut) धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांप्रकरणी वांद्रे कोर्टाने कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिसांना (Mumbai Police) हे आदेश दिले आहेत.
मोहम्मह अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने वांद्रे सत्र न्यायालयात तक्रार केली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणौतने बॉलिवूड आणि एका समाजाविरोधात वक्तव्ये केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार केली होती. तसेच कंगनाचे ट्वीट, व्हिडीओ या व्यक्तीने न्य़ायालयात सादर केले होते. न्यायालयाने आज कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले असून याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर केले जातील. यानंतरच न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.
यावर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाच्या बाबतीत एवढ्या तक्रारी आल्या आहेत, की गृहखात्याने तक्रारी केली तर राजकीय हेतूने केल्याचे आरोप रामदास आठवलेंसह अनेकांनी केले असते. आता न्यायालयाने आदेश दिले आहेत.