उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कन्नौज येथील छिबरामऊ नगरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये शनिवारी सायंकाळी अजब घटना बघायला मिळाली. इथे सुरू असलेल्या एका लग्नात एक महिला पोहोचली. या महिलेला बघून नवरदेव मंडपातून पळून गेला. आश्चर्याची बाब म्हणजे तो नवरीलाही सोबत घेऊन पळाला. कुटुंबियांना जेव्हा याची खबर लागली तेव्हा सगळेच हैराण झाले. पोलिसही दोघांचा बराचवेळ शोध घेत राहिले, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, लग्न समारंभात अचानक आलेली ही महिला नवरदेवाची पहिली पत्नी होती. ती शेजारच्याच गावात राहत होती. लग्नानंतर काही महिन्यांनीच तरूणाने तिला सोडलं होतं. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने त्याला तिला महिन्याचा खर्च देण्याचा आदेश दिला होता. महिलेनुसार, कोर्टाच्या आदेशानंतरही तिला एकही रूपया मिळाला नाही. अशात जेव्हा तिला या लग्नाबाबत समजलं तेव्हा ती आधी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिथून पोलिसांसोबत लग्नात पोहोचली होती.
आपल्या पहिल्या पत्नीला बघताच नवरदेव लग्न मंडपातून नवरीला सोबत घेऊन फरार झाला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाही तर अखेर महिलेने पोलिसात तक्रार दिली. तसेच यावेळी हेही समोर आलं की, तरूणाचं हे तिसरं लग्न होत होतं. पहिल्या पत्नीला सोडल्यानंतर त्याने आणखी एका महिलेसोबत लग्न केलं होतं. पण काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या पत्नीच्या कुटुंबियांनी तरूणावर केसही केली होती. तो तुरूंगातही गेला होता.
तुरूंगातच त्याची भेट कनौज गावातील एका व्यक्तीसोबत झाली होती. दोघांमध्ये संवाद सुरू झाला होता. ज्यानंतर त्याने आपल्या भाचीसोबत या तरूणाचं लग्न ठरवलं होतं. शनिवारी लग्न समारंभ सुरू होता. यादरम्यान नवरदेव नवरीला पार्लरमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने दोन-तीन महिलांना सोबत घेऊन गाडीतून गेला. त्याने महिलांना रस्त्यात मधेच उतरून दिलं आणि त्यानंतर नवरी परत आली नाही.