कानपूर - उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एटीएसने अल कायदा समर्थित अन्सार गजवतुल हिंद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना लखनऊमधून अटक केली आहे. एटीएसच्या या कारवाईने एक मोठा कट उधळून लावला आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी मसीरुद्दीन आणि मिनहाजचे अनेक साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांचे कानपूरचे कनेक्शन समोर येत आहे. एटीएसच्या अनेक पथकांनी शहरातील चमनगंज, जाजमऊ, नई सडक, मचारिया यासारख्या ठिकाणी तळ ठोकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने छापा टाकून रात्री उशिरा चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसला कानपूरच्या संरक्षण संस्थांचे नकाशे मसिरुद्दीन आणि मिनहाज यांच्याकडून मिळाले आहेत. यासह हे दोघेही कानपूरला आले. शहरातील विविध ठिकाणी भेट दिली. एटीएसच्या चौकशीदरम्यान त्यांचे साथीदार कानपूर येथे असल्याचे समजले असून ते मसीरुद्दीन आणि मिनहाजसाठी काम करतात. कानपूरशी संबंधित माहिती ते दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवतात. हे दोन्ही अतिरेकी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने मोठी घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते.लखनऊमधून दोन दहशतवाद्यांना अटक झाल्यानंतर कानपूर पोलीस हाय अलर्टवर आहेत. कानपूर सेंट्रल स्टेशन, बसस्थानक यासह शहरातील प्रमुख ठिकाणी रविवारी रात्री तपासणी मोहीम राबविण्यात आली. संशयास्पद वाहनांची तपासणीही केली जात आहे. यासह शहरात प्रवेश करणार्या वाहनांवरही नजर ठेवली जात आहे.कानपूर दहशतवादी घटना२१ वर्षांपूर्वी १४ ऑगस्ट २००० रोजी आर्यनगरमध्ये पहिला कुकर बॉम्ब फुटला होता. आयएसआय एजंट इम्तियाज याला ११ सप्टेंबर २००९ रोजी सचेन्डी येथून अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर दुसरा आयएसआय एजंट वकास याला २७ सप्टेंबर २००९ रोजी बिथूर येथून अटक करण्यात आली होती. १८ सप्टेंबर २०११ रोजी एटीएसने रेहमान उर्फ गद्दूला रेल्वे बाजारातून अटक केली. रेहमान हा आयएसआय एजंट होता, तो पाकिस्तानला माहिती पाठवत असे. पाटणा स्फोटातील संशयितास एटीएसने १४ एप्रिल रोजी पांकी स्थानकातून अटक केली होती.२०१७ मध्ये, इसिसच्या दहशतवाद्यांचा खोरासन विभाग उघडकीस आला. एटीएसने १४ सप्टेंबर २०१८ रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनचा करुझमा उर्फ कमरुद्दीन याला जाजमऊ येथून अटक केली होती.