आपली मुलं शिकून चांगली व्यक्ती बनतील आणि आपलं नाव मोठं करतील या विचाराने पालक आपल्या मुलांचं संगोपन करतात. पण कानपूरमध्ये एक कुटुंब आहे जिथे आई-वडील दोघेही चोर आहेत. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना आपल्याप्रमाणेच चोरीच्या धंद्यात सहभागी करून घेतलं आहे. विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंब मिळून चोरी करतात आणि लाखोंचा मुद्देमाल लंपास करतात. पण ते म्हणतात ना की, चोर कितीही हुशार असला तरी तो पोलिसांपासून सुटू शकत नाही.
रविवारी पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली कुटुंबातील चार सदस्यांसह पाच जणांना अटक केली. मात्र त्यांचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. त्याचा शोध अजूनही सुरू आहे. कानपूरचे सह पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी सांगितले की, एका अधिकाऱ्याच्या घरात चोरी झाली आहे. अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरात बसवलेले 50 सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले असता त्यांना एका जोडप्यावर संशय आला.
50 लाखांचे दागिने जप्त
पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेऊन त्यांची कसून चौकशी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्या निगम आणि राजेश निगम हे त्यांच्या दोन मुलांसह चोरीच्या घटना घडवून आणतात. ज्याच्या घरात चोरी करायची आहे, ते जोडपे आधी त्या घराची काही दिवस रेकी करतात. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर त्यांची दोन्ही मुले अंकित आणि संदीप हे संधी साधून रात्री त्या घरात चोरी केली करतात. यानंतर ते चोरीचा माल दुकानात विकतात. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथून चोरीचे 50 लाखांचे दागिने, चोरलेल्या देवाच्या मूर्ती आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
कसून चौकशी केली असता सांगितलं सत्य
सर्व प्रथम, चौकशीदरम्यान राजेशने सांगितले की, माझा मुलगा आणि मीच चोरी करतो. इतर लोकांचा यात हात नाही. पण पुरावे काही वेगळेच सांगत होते. वास्तविक, सीसीटीव्हीमध्ये राजेशची पत्नी संध्याही त्याच्यासोबत नेहमीच दिसत होती. त्यामुळेच पोलिसांनी राजेशची कसून चौकशी केली असता त्याने सत्य सांगितलं. त्याने सांगितले की, चोरीचे दागिने ते काही लोकांना देतात, जे त्यांच्याच टोळीचे सदस्य आहेत. मग ते दागिने पुढे दुकानात विकतात. सध्या या प्रकरणी पोलिसांनी राजेश, संध्या, अंकित, संदीपसह त्यांचा एक साथीदार वेद याला अटक केली आहे. तर उर्वरित तीन साथीदार अद्याप फरार आहेत. त्याचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.