कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे बलात्कारातील दोषीनं एका मुलीच्या आयुष्यात जो खेळ मांडला तो एका सिनेमाच्या कथानकापेक्षाही कमी नाही. सूरज नावाच्या आरोपीने २ वर्षापूर्वी पीडित मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा आरोपी आणि त्याच्या घरच्यांनी मुलीसोबत लग्न करण्याचं वचन दिले. परंतु २ महिन्यांनी त्यांनी लग्नास नकार दिला तोपर्यंत पीडित मुलगी गर्भवती राहिली.
मुलीच्या वडिलांनी कसंतरी तिचं लग्न कन्नौजमध्ये ठरवलं. लग्नाच्या काही दिवसांनी मुलगी माहेरी परतली तेव्हा आरोपी सूरजनं तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला तेव्हा आरोपी सूरजनं तिच्या पतीला भडकावून तुझ्या बायकोला मी प्रेग्नेंट केलंय, तिच्या पोटात माझी खूण आहे असं म्हटलं. त्यामुळे नाराज पतीने पत्नीला सोडून दिले. काही महिन्यांनी पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला.
मागील २५ सप्टेंबरला सूरजने पुन्हा मुलीवर बलात्कार केला. सूरजनं पीडित मुलीवर दबाव आणला त्यामुळे तिने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला नाही. ८ ऑक्टोबर पीडित मुलीने शिवराजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. परंतु अद्याप पोलिसांनी आरोपी सूरजला अटक केली नाही. पीडित मुलीच्या मुलाचा आणि सूरजचा डीएनए चाचणी केल्यानंतर पुढील कार्यवाही करू असं पोलिसांनी म्हटलं आहे. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर सूरजवर अटकेची कारवाई करण्यात येईल. पोलिसांनी कोर्टात डिएनए चाचणीसाठी परवानगी द्यावी असा अर्ज केला आहे. तर डिएनए रिपोर्ट आल्यानंतर आधी बाळाला आणि नंतर तुला ठार मारणार अशी धमकी सूरजनं पीडित मुलीला दिली आहे.
या प्रकरणी पीडितेच्या नातेवाईकांनी म्हटलं की, आरोपी सूरजनं पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आता पोलीस सांगतात आधी डिएनए चाचणी करू, त्यासाठी कोर्टाची परवानगी मागू पण या कालावधीत जर पीडितेला काही झालं तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी विचारला. तर कानपूरचे एएसपी विजेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं की, एका महिलेने लग्नानंतर बाळाला जन्म दिला. माहेरी आल्यावर तिच्यासोबत एकाने बलात्कार केल्याचा आरोप लावला. डिएनए रिपोर्ट आल्यानंतर आरोपीवर अटकेची कारवाई करू असं पोलिसांनी म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"