Karnataka Crime News: कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यात एका 26 वर्षीय महिलेने आपल्या 6 वर्षीय अपंग मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकून दिले. पतीसोबत भांडण झाल्यानंतर महिलेने हे पाऊल उचलले. या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.
मुलाच्या अपंगत्वावरुन जोडप्यात भांडणंमीडिया रिपोर्ट्सनुसार, सावित्री आणि रवी कुमार, या जोडप्याला दोन मुले होती. त्यातील मोठ्या मुलगा बोलू आणि ऐकू शकत नव्हता. यावरुन पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे व्हायची. रवी कुमार सावित्रीला नेहमी प्रश्न करायचे की, तिने अपंग मुलाला का जन्म दिला? तो अनेकदा रागाच्या भरात कुठेतरी मुलाला फेकून देण्यास सांगायचा. शनिवारी(4 मे) संध्याकाळीही त्यांच्यात याच कारणावरुन जोरदार भांडण झाले. यानंतर संतापलेल्या सावित्रीने मुलाला काली नदीला जोडलेल्या कालव्यात फेकून दिले. या नदीत मोठ्या प्रमाणात मगरी राहतात.
यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, अंधार पडल्याने पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. रविवारी(5 मे) सकाळी नदीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्याच्या शरीरावर खोल जखमा होत्या आणि त्याचा एक हातही बेपत्ता होता. यावरुन मगरीने मुलाची शिकार केल्याचे दिसून येते. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक करुन तुरुंगात पाठवले आहे.