बंगळुरू: भ्रष्टाचार विरोधी विभागानं कर्नाटक सरकारमधील १५ अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती, मालमत्ता जमवल्याची माहिती मिळाल्यानं एसीबीनं राज्य सरकारमधील अधिकाऱ्यांच्या घरांवर धाडी टाकल्या. जवळपास ६० ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमधून कोट्यवधींचं घबाड हाती लागलं. यामध्ये सोनं, रोख रक्कम आणि संपत्तीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी जमा केलेली माया पाहून एसीबीच्या अधिकाऱ्यांना धक्काच बसला. अधिकारी मोजून दमले. मात्र तरीही भ्रष्ट अधिकाऱ्यांची संपत्ती संपेना, अशी वेळ आली.
कर्नाटक सरकारच्या १५ अधिकाऱ्यांच्या मालमत्तांवर एसीबीनं छापे टाकले. या कारवाईत ८ एसपी, १०० अधिकारी आणि ३०० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. एसीबीच्या पथकानं ६० ठिकाणांवर धाडी टाकल्या. या कारवाईदरम्यान साडे आठ किलोहून अधिक सोनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या घरातून हस्तगत करण्यात आलेली संपत्ती पाहून एसीबीच्या पथकाचे डोळे विस्फारले.
कृषी विभागाचे संयुक्त संचालक टी. एस. रुद्रेशप्पा यांच्या घरातून ७ किलो सोनं ताब्यात घेण्यात आलं. त्याचं बाजारमूल्य ३.५ कोटी रुपये आहे. त्यांच्या घरात १५ लाखांची रोकड आढळून आली. वरिष्ठ मोटर निरीक्षक सदाशिव मारलिंगन्नावर यांच्या घरातून १.१३५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. त्यांच्या घरात ८ लाख २२ हजार १७२ रुपयांची रोकड सापडली.