नवी दिल्ली – त्याची बायको माहेरी होती, एकेदिवशी तो सातत्याने तिला कॉल करत होता. परंतु बायकोचा काही रिप्लाय येत नव्हता. एकदा तर त्याने बायकोला १०० हून अधिक कॉल केले तरीही तिने कॉल उचलला नाही. या प्रकाराने पतीला खूप राग आला. त्यानंतर त्याने एक प्लॅन बनवला आणि सासरच्या दिशेने निघाला. जवळपास ५ तासांचा प्रवास करून तो पत्नीच्या घरी पोहचला. मुलाला पाहण्याच्या बहाण्याने त्याने पत्नीला खून केला. त्यानंतर जे काही केले त्याने सर्वांना हैराण केले. नेमकं या खूनामागे काय घडलं ते पाहू.
ही घटना आहे कर्नाटकची, ज्याठिकाणी चामराजनगरच्या रामसमुद्रमध्ये पोलीस ठाण्यात ३२ वर्षीय कॉन्स्टेबल किशोर डी तैनात होता. त्याचे लग्न झाले होते. परंतु २४ वर्षीय पत्नी गर्भवती असल्याने ती कोलाथूर गावातील तिच्या माहेरी गेली होती. जिथं ११ दिवसांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी नवजात मुलीला पाहण्यासाठी किशोर उत्सुक होता. त्याने ड्युटीला सुट्टी घेऊन २३२ किलोमीटर दूर होसाकोटे इथं सासरी जात होता. परंतु त्याच्या डोक्यात भलतंच काही सुरू होतं हे कुणालाही माहिती नव्हते.
काही तास प्रवास करून तो पत्नीच्या घरी पोहचला. पत्नीच्या घरच्यांनी जावयाचे स्वागत केले. किशोर तिथेच राहिला. सोमवारी काही कामानिमित्त सासरची मंडळी बाहेर गेली होती. घरात केवळ किशोर, त्याची पत्नी प्रतिभा आणि नवजात मुलगी होती. तेव्हा अचानक किशोर प्रतिभाच्या खोलीत गेला आणि तिला काही कळण्याच्या आत तिचा गळा दाबायला सुरुवात केली. प्रतिभा तडफडत होती, परंतु किशोरने मूठ सैल केली नाही. जोपर्यंत प्रतिभाचा जीव जात नाही तोवर किशोरने गळा दाबून ठेवला. अखेर प्रतिभा संपली, तिचं शरीर थंडगार पडलं होते.
त्यानंतर किशोरने दिर्घ श्वास घेतला, एक साडी आणून पंख्याला लटकवून प्रतिभाच्या गळ्याभोवती फास घातला. ही हत्या नसून आत्महत्या आहे हे दाखवण्याचा त्याचा बनाव होता. परंतु तेव्हा सासरचे परतले. त्यात किशोर गडबडला आणि तिथून पळ काढला. किशोर पळून जाताना पाहून सासरच्यांनी प्रतिभाच्या खोलीत पाहिले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात सन्नाटा पसरला, त्यानंतर सासरच्यांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रतिभाचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला आणि किशोरचा शोध घेऊ लागली. प्रतिभाची हत्या करणारा आरोपी पोलीस पती हा त्याच्या मूळगावी कोलारला गेला होता. जिथे त्याने किटक फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या तो गंभीर अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आहेत. तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस त्याला अटक करणार आहेत.
पोलीस तपासात कळाले की, मागील वर्षी प्रतिभा आणि किशोरचं लग्न झालं होते. परंतु लग्नाच्या काही दिवसांत त्यांच्यात भांडणे होऊ लागली. किशोरला नेहमी पत्नी प्रतिभाच्या चारित्र्यावर संशय होता. तो प्रतिभाला आरोप लावायचा. तिचा छळ करायचा. वैवाहिक कारणामुळे प्रतिभाच्या घरच्यांनी अनेकदा किशोरला समजावलं होते. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रतिभाचे किशोरसोबत लग्न झाले होते. प्रतिभाचं पदवीपर्यंत शिक्षण झाले होते. किशोर नेहमी तिचा फोन चेक करायचा, तिला अनोळखी व्यक्तीने संदेश पाठवले तर त्याचा जाब विचारायचा. रविवारी किशोरने प्रतिभाला कॉल केला होता. कॉलवरच त्यांची भांडणे सुरू झाली. त्यात प्रतिभाच्या आईने तिचा फोन कट करून बाळाच्या आरोग्यावर परिणाम होईल असं बजावलं. त्यानंतर दुसऱ्यादिवशी किशोरने प्रतिभाला १५० कॉल केले तरी तिने उचलले नाही याचाच राग किशोरने डोक्यात घेतला असा आरोप प्रतिभाच्या घरच्यांनी केला आहे.