कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची बंगळुरूमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली, पत्नीनेच हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये या जोडप्यात वारंवार भांडणं होत होती आणि पत्नीने यापूर्वीही तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली होती असं म्हटलं आहे. १९८१ च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी ओम प्रकाश काल बंगळुरू येथील त्यांच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले. त्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूचे अनेक जखमा होत्या.
आई द्यायची धमकी
निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा कार्तिकेशने पोलिसांना सांगितलं आहे की, त्याची आई पल्लवी आधीच त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होती. या धमक्यांमुळे ओम प्रकाश हे त्यांच्या बहिणीकडे राहायला गेले होते, पण हत्येच्या दोन दिवस आधी त्यांची मुलगी कृती त्यांना भेटायला आली आणि परत येण्यास दबाव आणला. तिने तिच्या वडिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध घरी परत आणलं. आई आणि बहीण दररोज वडिलांशी भांडायची. कार्तिकेशने त्याच्या तक्रारीत ही सर्व माहिती दिली आहे.
वडील रक्ताच्या थारोळ्यात
हत्येच्या दिवशी कार्तिकेश डोमलूर येथील कर्नाटक गोल्फ असोसिएशनमध्ये होता. त्याने सांगितलं की, संध्याकाळी त्याला त्याच्या एका शेजाऱ्याचा फोन आला की त्याचे वडील खाली पडले आहेत. तो काही मिनिटांत घरी पोहोचला तेव्हा त्याचे वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्याच्या मृतदेहाजवळ एक तुटलेली बाटली आणि चाकू सापडला. कार्तिकेशने असाही दावा केला की, त्याची आई आणि बहीण मानसिक आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त आहेत.
आई आणि बहीण डिप्रेशनमध्ये
माझी आई पल्लवी आणि माझी बहीण कृती डिप्रेशनने ग्रस्त होत्या आणि त्या माझ्या वडिलांशी अनेकदा भांडत होत्या. माझ्या वडिलांच्या हत्येत त्यांचा सहभाग असल्याचा मला संशय आहे. पल्लवी आणि कृती यांची पोलिसांनी १२ तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही अशी माहिती कार्तिकेशने दिली.
मिरची पावडर आणि उकळतं तेल फेकलं
सूत्रांनी सांगितलं की, प्राथमिक तपासात पल्लवीने ओम प्रकाश यांच्यावर मिरची पावडर फेकली, त्यांना बांधलं, उकळतं तेल फेकलं. काचेच्या बाटलीने हल्ला केला आणि चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे. पल्लवीने चाकूने वार केल्यानंतर, दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीसमोर तिने तिच्या पतीची हत्या केल्याची कबुली दिली. महिलेने तिच्या पतीला माहिती दिली, ज्याने पोलिसांना हत्येची माहिती दिली. संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.