कर्नाटकमध्ये सध्या भाजपा आमदारा आणि त्याच्या मुलाकडे सापडलेली करोडोंची कॅश, दागिने चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या मुलाला ४० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले होते. यानंतर त्याच्या घरी छापा मारला असता त्यांच्याकडे तब्बल 8.23 कोटी रुपये सापडले होते. या आमदाराने आता अजब दावा केला आहे.
राजकारण्यांकडून शेतीचे भरमसाठ उत्पन्न दाखविण्याची बाब काही नवी नाही. परंतू, कर्नाटकातीलभाजपाच्या आमदाराने ते आपलेच पैसे असल्याचा दावा केला आहे आणि ते देखील सुपारी विकून कमविलेले उत्पन्न असल्याचे म्हटले आहे. याची कागदपत्रे मी सादर करीन असेही या आमदाराने कोर्टात सांगितले आहे.
मंगळवारी कोर्टाने विरुपक्षप्पा यांना अंतरिम जामिन मंजूर केला आहे. तसेच ४८ तासांत लोकायुक्तांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. विरुपक्षप्पा हे कर्नाटक सोप्स एंड डिटर्जेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडलेय की सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर छापेमारी करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. घरात सापडलेले पैसे आपल्या कुटुंबाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचा तालुका हा सुपारीची शेतीसाठी ओळखला जातो. आमच्या सुपारीच्या जमिनीत एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात पाच ते सहा कोटी रुपये आहेत. माझ्याकडे 125 एकर सुपारी फार्म, सुपारी मार्केट आणि इतर अनेक व्यवसाय आहेत. मी लोकायुक्तांना योग्य ती कागदपत्रे देईन आणि माझे पैसे परत घेईन, असे विरुपक्षप्पा म्हणाले. विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार एमव्ही याला KSDL कार्यालयात एका कंत्राटदाराकडून 40 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते. तो देखील निर्दोष असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. मदल विरुपक्षप्पा हे दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात 5.73 कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. 2013 च्या निवडणुकीत त्यांनी 1.79 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.