मुंबई - नालासोपाऱ्यात वैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्याकडे सापडलेल्या स्फोटकांबाबत महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या चौकशीतून उघडकीस आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकातील कलबूर्गी आणि पञकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबधित असल्याच्या संशयावरून शनिवारी कर्नाटकचे विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबईला आले होते. कलबूर्गी आणि पञकार गौरी लंकेश यांंच्या हत्येची माहिती कर्नाटक एसआयटीने एटीएसच्या अधिकाऱ्यांना दिली. तसेच नालासोपारा येथील स्फोटकांची माहिती घेत वैभव राऊत, शरद कळसकर, श्रीकांत पांगारकर, सुधन्वा गोंधळेकर आणि अविनाश पवार या आरोपींकडे सुमारे पाऊण तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान एटीएसच्या एका अधिकाऱ्याने भाषेचा अडथळा येऊ नये. यासाठी मदत केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी पोलिसांनी रविवारी घाटकोपरच्या भटवाडी परिसरातून अविनाश पवार याला अटक केली. अनेक कारणास्तव अविनाश अटक केलेल्या सर्व आरोपींच्या संपर्कात होता. ही स्फोटक बनवण्यात ही त्याचा सहभाग निश्चित झाल्यानंतरच एटीएसने अटकेची कारवाई केली. अविनाशच्या अटकेनंतर कर्नाटकात लेखक एम. कलबुर्गी आणि पञकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात महाराष्ट्र एटीएसने नुकत्याच स्फोटक प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा हात असल्याचा संशय कर्नाटकच्या एसआयटीने व्यक्त केला होता. त्यानुसार कर्नाटक एसआयटीने स्फोटकासंदर्भातील आरोपी आणि गुन्ह्यांची माहिती महाराष्ट्र एटीएसकडे मागितली होती. त्याचबरोबर एटीएसने देखील कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींचा संबध निश्चित करायचा होता. त्या अनुषंगाने शनिवारी कर्नाटक एसआयटीचे अधिकारी मुंबईत आले होते. रविवारी दिवसभर महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांबरोबर माहितीची देवाण घेवाण करून एसआयटीने स्फोटकातील आरोपींकडे ही पाऊण तास कसून चौकशी केली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यावेळी भाषेची अडचण येऊ नये म्हणून एटीएसचे अधिकारी देखील चौकशीदरम्यान उपस्थित होते.
या चौकशीदरम्यान नुकताच अटक केलेला आरोपी अविनाश पवार याचा सनातनच्या अनेक कार्यक्रमास सहभागी असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याचा गोवा आणि पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वावर होता. सनातनसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक कार्यक्रमाला अविनाशने उपस्थिती दाखवल्याची माहिती देखील पुढे आली आहे. अविनाशच्या घराची एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ज्या वेळी झडती घेतली. त्यावेळी अविनाशच्या कपाटात २० एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या ‘सनातन प्रभात’ या वृत्तपत्राचा अंक होता. या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ‘हिंदुत्वनिष्ठ’ अविनाश पवारसह अन्य ‘धर्म व राष्ट्रप्रेमी’ १५ एप्रिलला सनातनच्या पनवेल येथील आश्रमात उपस्थित असल्याचे म्हटले आहे. हिंदू एकता जागृती समितीचे सुभाष अहिर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिनेश आव्हाड आणि अविनाश पवार यांनी एकत्र येत ‘श्री शिवछत्रपती स्वराज्य’ या संकेतस्थळाची निर्मिती केली होती. हे संकेतस्थळ म्हणजे स्वदेशी वस्तूंची ऑनलाइन बाजारपेठ. या संकेतस्थळाचे उद्घाटन सनातनच्या पनवेल आश्रमात रमेश गडकरी यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती या वृत्तात देण्यात आली होती. घाटकोपरच्या भटवाडीत अविनाश आपल्या आईसोबत रहात होता. वडिल अनंत यांच्या निधननंतर माझगाव डॉक येथे वडिलांच्या नोकरीच्या जागी अविनाश अनुकंपातत्वावर कामाला राहिला.
वैभव राऊतसह अटकेतील इतर आरोपी सनातनचे साधक नाहीत, सनातन संस्थेचा दावा