लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - केबीसी मधून बोलत आहे , तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगून एका महिला असिस्टंट डायरेक्टरला ६७ हजारांना फसवले . वर आणखी पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात तिघा अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
वेबसिरीजच्या असिस्टंट डायरेक्टर असलेल्या मीना रमेशचंद्र मौर्य ह्या काशीगाव भागातील अमिषा गार्डन मध्ये राहतात . त्यांना अनोळखी कॉल आला व समोरच्याने केबीसीचा कर्मचारी जसपाल सिंग बोलतोय आणि तुम्हाला केबीसीच्या २५ लाखांची लॉटरी लागली आहे असे सांगितले . त्याने मीना यांना व्हॉट्सअप वर त्यांच्या नावे असलेला २५ लाख रुपयांच्या धनादेशाचा फोटो पाठवला .
बक्षिसाची रक्कम हवी असेल तर ४८ हजार कर रक्कम, १८ हजार बँक ट्रान्स्फर खर्च आदी मिळून ६७ हजार रुपये भरण्यास सांगितले . त्यानुसार मीना यांनी ती रक्कम त्याने सांगितलेल्या खात्यावर ऑनलाईन भरली. त्यानंतर आणखी ३५ हजार भरण्यास सांगितले असता मीना यांनी नकार देताच अन्य दोन क्रमांकावरून त्यांना पैशांसाठी कॉल आले शिवाय त्यांना पैसे दिले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली गेली . या प्रकरणी सोमवारी काशीमीरा पोलीस ठाण्यात जसपाल सिंग सह अन्य दोन मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.