कल्याण - नोकरीला लावून देतो अशी बतावणी करत पाच लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या शिपाई कर्मचा-याचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने निलंबन केले आहे. किसन घावरी असे या कर्मचा-याचे नाव असून या प्रकारामुळे आधीच लाचखोरीच्या वादग्रस्त चर्चेत असलेल्या केडीएमसीची प्रतिमा आणखीन मालिन झाली आहे.
किसन घावरी हे केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर पैसे घेऊनही नोकरीस रुजू केले नाही असा आरोप करण्यात आला होता. केडीएमसीचे सेवानिवृत्त मुकादम भोला चव्हाण यांचा मुलगा यशवंत चव्हाण याला वारसाहक्काने नोकरीस लावून देण्यासाठी घावरी यांनी पाच लाख रुपये घेतले होते. मात्र, यापैकी केवळ 1 लाख रुपये घावरी यांनी परत केले व मुलासही नोकरीस रुजू करून घेतले नाही असा आरोप चव्हाण यांनी केला होता. याबाबत चव्हाण यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार अर्ज दिला आहे. तसेच मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याने याप्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने घावरी यांचे निलंबन केले आहे.