नातवाचं लैंगिक शोषण; 64 वर्षांच्या आजोबाला 73 वर्षांची शिक्षा, आजीनं केला होता खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:57 PM2022-03-21T22:57:31+5:302022-03-21T22:58:49+5:30
खटल्यादरम्यान, मुलाचे वडील आणि इतर काही नातलगांनी आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण...
इडुक्की (केरळ) येथील एका फास्ट-ट्रॅक न्यायालयाने, तीन वर्षांपूर्वी आपल्या सात वर्षांच्या नातवाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 64 वर्षीय आजोबांना तब्बल 73 वर्षांची शिक्षा आणि 1,60,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या दोषी आजोबाला किमान वीस वर्षांची शिक्षा भोगावी लागणार आहे. कारण शिक्षेचा कालावधी एकत्रित असेल. याच वेळी, अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी दोषी कोणत्याही प्रकारच्या सहानुभूतीस आणि प्रतिबंधात्मक शिक्षेस पात्र नाही, असेही फास्ट ट्रॅक न्यायालयाचे न्यायाधीश पी जी व्हर्गीस यांनी निकाल देताना म्हटले आहे.
ही घटना 2019 मध्ये घडली. आजीने (आरोपीची पत्नी) संबंधित प्रकार पाहिल्यानंतर, यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली, तेव्हा ही घटना समोर आली. यानंतर वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली आणि दोषीला लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली.
खटल्यादरम्यान, मुलाचे वडील आणि इतर काही नातलगांनी आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्यांचे आधीचे म्हणणे आणि वैद्यकीय अहवालांवरच विश्वास ठेवला. याच बरोबर दंडा शिवाय, न्यायालयाने कायदेशीर सेवा प्राधिकरणाला मुलाला योग्य भरपाई देण्याचेही निर्देश दिले आहेत.
या संदर्भात बोलताना सरकारी वकील सनेश एस एस म्हणाले, "त्याना POCSO च्या तीन कलमांतर्गत प्रत्येकी 20-20 वर्षांची आणि वारंवार गुन्हा केला म्हणून 10 वर्षे आणि कलम 377 (अनैसर्गिक लैंगिक संबंध) अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे." याच बरोबर, राज्यातील एखाद्या दोषीला एवढी मोठी शिक्षा होण्याची ही पहिलीच वेळ आहे, असेही ते म्हणाले.