टीपूचं सिंहासन, शिवाजी महाराजांची गीता असल्याचं सांगत यूट्यूबरने घातला कोट्यावधी रूपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:59 PM2021-09-28T17:59:05+5:302021-09-28T18:02:59+5:30
चौकशीतून समोर आलं आहे की, काही वर्षापूर्वी आरोपी मॉनसनने राजकारणी, उद्योगपती आणि सिने इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या लोकांसोबत ओळख निर्माण केली होती.
केरळमधील कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी यूट्यूबर मॉनसन मावुंकल याला अटक केली. आरोप आहे की, अनेक नामवंत लोकांची त्याने फसवणूक केली. तो स्वत:ला प्राचीन कलाकृतींचा संग्राहक सांगून लोकांना फसवत होता. त्याच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
केरळमधील चेरथला येथे राहणाऱ्या मॉनसनचा दावा आहे क, त्याच्याकडे टीपू सुलतानचं सिंहासन, मूसाची निशाणी, औरंगजेबाजाची अंगठी, शिवाजी महाराजांची भगवद गीता आणि सेंट एंटनीची नखे यांसारख्या दुर्मीळ वस्तू आहेत. त्याच्यावर आरोप आहे की, याच कलेक्शनच्या नावावर त्याने लोकांकडून पैसे लुटले.
गेल्या अनेक वर्षांपासून तो लोकांची फसवणूक करून कोट्यावधी रूपये लुटत आहे. सोबतच त्याने लोकांना सांगितलं की, त्याचे लाखो रूपये परदेशी बॅंकांमध्ये अडकले आहेत. हे ते पैसे आहेत जे अनेक शाही परिवारांनी त्याला त्याच्याकडून कलाकृती विकत घेतल्यावर दिले.
तो लोकांना सांगत होता की, ते पैसे मिळाल्यानंतर तो कोच्चिमध्ये एक विशाल संग्रहालय बनवणार आहे. पोलिसांनी जेव्हा त्याच्या घरी छापा मारला तेव्हा असं दिसून आलं की, त्याच्याकडील जास्तीत जास्त कलाकृती त्याने स्थानिक कलाकाराकडून तयार करून घेतल्या होत्या. या सर्व कलाकृती नकली होत्या.
चौकशीतून समोर आलं आहे की, काही वर्षापूर्वी आरोपी मॉनसनने राजकारणी, उद्योगपती आणि सिने इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या लोकांसोबत ओळख निर्माण केली होती. तक्रारीनुसार, मॉनसन प्रभावशाली लोकांच्या नावाचा वापर करत होता. खासकरून पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या नावांचं वापर तो अशा लोकांसमोर करत होता ज्यांचे त्याच्याकडे पैसे होते.