सोने तस्करी प्रकरणी केरळ कोच्चीच्या कोर्टात मुख्य आरोपी असलेली स्वप्ना सुरेशला हजर करण्यात आले. यावेळी तिने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप लावल्यानं राज्यात खळबळ माजली आहे. सोने तस्करीत मुख्यमंत्री विजयनही सहभागी असल्याचा दावा आरोपीने केला. २०१६ मध्ये विजयन दुबईत आले होते तेव्हा त्यांना पैशांनी भरलेली बॅग पाठवली होती असं तिने सांगितले.
स्वप्ना सुरेश यांनी कोर्टात मुख्यमंत्री, त्यांचे माजी प्रमुख सचिव एम. शिवशंकर, विजयन यांची पत्नी कमला, मुलगी विना, खासगी सचिव सी.एम रवींद्रन यांची नावं घेतली. स्वप्नानं म्हटलं की, २०१६ मध्ये जेव्हा मुख्यमंत्री संयुक्त अरब अमीरात येथे दौऱ्यावर आले होते. तेव्हा भारतीय दुतावासात मी सचिव होती तेव्हा शिवशंकर यांनी सर्वात आधी मला संपर्क साधला. मुख्यमंत्री त्यांची एक बॅग घ्यायला विसरले आहेत ती दुबईला घेऊन जायची आहे. आम्ही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ती बॅग मुख्यमंत्र्यांकडे पोहचवली. मात्र या बॅगेत रोकड असल्याचं समोर आले होते.
बाकी वेळ आल्यावर उघड करेनस्वप्ना म्हणाली की, शिवशंकर यांच्या सूचनेनुसार बिर्याणीची जड भांडी महावाणिज्य दूतावास ते मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या क्लिफ हाऊसपर्यंत नेण्यात आली. बिर्याणीशिवाय इतरही जड पदार्थ त्यात होते. मी आत्ताच सर्व काही सांगू शकत नाही. वेळ आल्यावर मी आणखी खुलासा करेन. स्वप्नाने दावा केला की तिने केंद्रीय तपास यंत्रणांना तपशीलवार पुरावे दिले असले तरी अजूनही काही भाग आहेत ज्यात तपासाची गरज आहे.
काय आहे सोने तस्करी घोटाळा?५ जुलै २०२० रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी तिरुअनंतपुरम विमानतळावर UAE वाणिज्य दूतावासातील एका व्यक्तीकडून १५ कोटी रुपये किमतीचे ३० किलो सोने जप्त केले. यूएई वाणिज्य दूतावासात काम करणाऱ्या सरित पीएसला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर, केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले माजी वाणिज्य दूतावास कर्मचारी स्वप्ना सुरेश आणि एम शिवशंकर यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली. स्वप्नाने मैत्रीच्या बहाण्याने आपला विश्वासघात केल्याचा दावा शिवशंकरने आपल्या पुस्तकात केला आहे. याचा बदला म्हणून स्वप्नाने शिवशंकरवर अनेक आरोप केले आणि त्याने तिचा विनयभंग केला असल्याचं म्हटलं. सीमाशुल्क, ईडी आणि राज्य पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये सुरेश आणि शिवशंकर यांना अटक करण्यात आली होती. सर्व खटल्यांमध्ये जामीन मिळाल्यानंतर शिवशंकरची फेब्रुवारी २०२१ मध्ये आणि सुरेशची त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सुटका झाली.