केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जात बुडालेला एक इंजिनिअर, त्याची पत्नी आणि यूट्यूबर मुलीला अटक करण्यात आली आहे. यांनी 10 लाखांच्या खंडणीसाठी सहा वर्षांच्या मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा रंगल्यानंतर त्यांनी अपहरण केलेल्या मुलीला कोल्लम येथील सार्वजनिक मैदानात सोडलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पद्मकुमार (52), त्यांची पत्नी अनिता कुमारी (45), आणि त्यांची मुलगी अनुपमा पद्मन (20), जी YouTube वर खूप फॉलोअर्स असल्याचा दावा करते, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अपहरण झालेल्या मुलीकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे पद्मकुमारचं स्केच काढण्यात आलं. या स्केचच्या मदतीने पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यात यश मिळालं आहे.
अपहरणामागील कारण कुटुंबाची बिकट आर्थिक समस्या होती. एडीजीपी एमआर अजितकुमार म्हणाले की, खंडणीच्या संभाषणादरम्यान एका आरोपीचा आवाज स्थानिक लोकांनी ओळखला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा आरोपीच्या अटकेत महत्त्वाचा वाटा होता. अपहरणाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले होते. गेल्या एक वर्षापासून आरोपी हा प्लॅन करत होता आणि योग्य मुलाचा शोध घेत होता.
कम्पूटर सायन्स इंजिनिअर असलेला पद्मकुमार स्थानिक केबल टीव्ही नेटवर्क चालविण्यासह अनेक व्यवसाय करत होता. पण कोरोनानंतर त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं सांगण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितलं, आरोपींच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर 5 कोटींहून अधिक कर्ज होतं. त्याला 10 लाख रुपयांची तातडीची गरज होती, त्यामुळे कुटुंबीयांनी हा गुन्हा केला.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा कट करण्याच्या प्रयत्नात आरोपीने त्याच्या कारच्या दोन बनावट नंबरप्लेट बनवल्या. अपहरणामागे अनिता कुमारी असल्याचा पोलिसांना संशय आहे. एडीजीपीने असंही सांगितलं की आरोपीने यापूर्वी दोनदा मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी तिची आई आणि आजी देखील त्याच्यासोबत असल्याने तो यशस्वी होऊ शकला नाही.
20 वर्षांची अनुपमा सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाई करत असे, परंतु काही काळापूर्वी तांत्रिक कारणांमुळे ते अचानक बंद झाले, त्यामुळे कुटुंबाला पैसे कमवण्याचा दुसरा सोपा मार्ग विचार करण्यास भाग पाडले. मोठ्या भावासोबत क्लासवरून घरी जात असताना चिमुकलीचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर सर्वत्र याची चर्चा रंगल्यावर तिला सोडून देण्यात आलं आहे.