कोल्लम – केरळ राज्यातील कोल्लम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती. याठिकाणी एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आला. आंचल येथे राहणाऱ्या उथरा हिच्या मृत्यूबद्दल पोलिसांना संशय वाटू लागल्याने पोलिसांनी तिचा नवरा सूरजसह अन्य दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होतं.
या चौकशीतून पतीनेच पत्नीची हत्या केल्याचा उघड झालं आहे. सूरजला आपल्या पत्नीपासून सुटकारा हवा होता. सूरजला दुसऱ्या महिलेशी लग्न करायचं होतं. त्यासाठी सूरजने आपली पत्नी उथराला मारण्याचा कट रचला. पत्नीला मारण्यासाठी सूरजने सर्वात आधी यूट्युबवर व्हिडीओ बघणे सुरु केले. व्हिडीओच्या माध्यमातून त्याने साप पकडणे आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्याची ट्रेनिंग घेतली. त्याचसोबत सूरजने त्याचा साथीदार सुरेशची या कामासाठी मदत घेतली.
सुरेश हा सर्पमित्र आहे त्यामुळे सापाविषयी त्याला विशेष ज्ञान आहे. ६ मे रोजी सूरजने आपल्या मित्राकडून विषारी साप खरेदी केला आणि त्याला एका थैलीतून घरी आणलं. रात्रीच्या वेळी उथरा रुममध्ये झोपली होती तेव्हा पती सूरजने तो विषारी साप तिच्या अंगावर टाकला. बिथरलेल्या उथराने हालचाल केली असता सापाने तिला दोनदा दंश केला. सापाने दंश केल्यानंतर पती सूरजने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता साप पकडता आला नाही. तो साप रुममध्ये लपल्याने रात्रभर सूरजला झोप आली नाही असं पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांनी रुममध्ये गेल्यानंतर तिथे एसी सुरु होता, सर्व खिडक्या दरवाजे बंद होते. त्यामुळे साप नक्की आला कुठून हा प्रश्न त्यांना पडला. सुरुवातीला पती सूरजने हा साप कुठून आला हे माहिती नसल्याचं सांगितले त्यानंतर पोलिसांनी सूरज आणि त्याच्या साथीदाराची चौकशी केला असता पतीने हा गुन्हा कबूल केला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी उथराचे नातेवाईक घरी गेले असता तिचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. त्या रुममध्ये साप आढळला. यापूर्वीही उथराला सापाने दंश केला होता त्यामुळे उथराच्या घरच्यांना शंका आली. २ मार्च रोजी उथराला सापाने दंश केला होता. मात्र वेळीच उपचार झाल्याने तिचा प्राण वाचला होता. पण दुर्दैवाने दुसऱ्यांदा सापाने तिला चावल्याने तिचा मृत्यू झाला. सूरज एका बँकेत कामाला असून २ वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते. उथराला मारण्यासाठी सूरजने कोब्रा आणि रसेल वायपरसारख्या विषारी सापाचा वापर केल्याचं पोलीस चौकशीत उघड झालं.