केरळमधील मलप्पुरममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे काही गुंडांनी एका महिलेवर हल्ला केला. पैशांची देवाणघेवाण हे या हल्ल्यामागच कारण असल्याचं सांगण्यात आलं. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक बाब समोर आली. या महिलेने दोन महिन्यांपूर्वी याच हल्लेखोरांवर आपल्या मुलाची बाईक पेटवण्याचं काम दिलं होतं. मात्र दोन महिने उलटूनही पैसे न मिळाल्याने गुंडांनी महिलेवरच हल्ला केला.
मलप्पुरममधील मेलात्तूरमध्ये ही घटना घडली आहे. 17 सप्टेंबर रोजी महिलेवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी महिलेच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. नफिसा नावाची 48 वर्षीय महिला आपल्या मुलावर काही कारणावरून रागावली होती. आई आणि मुलामध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यावर आईने मुलाला विकत घेतलेली बाईक परत करण्यास सांगितले होते.
मुलाने मात्र बाईक परत करण्यास नकार दिल्याने आईने ती नष्ट करण्याचा निर्णय घेतला. तिने एक योजना आखली आणि आपल्या मुलाची बाईक जाळण्याचा निर्णय घेतला. हे काम पूर्ण करण्यासाठी गुंडांना पैशाचे आमिष दाखवून कामाला लावण्यात आले. मात्र या प्रकरणात आरोपी आणि महिलेमध्ये पैसे देण्यावरून वाद झाला आणि नंतर त्यांच्यात बाचाबाची झाली.
दरम्यान, त्या गुंडानी महिलेवर हल्ला करून तिच्या घराची तोडफोड केली. या प्रकरणात आता महिलेसह हल्लेखोर गुंडांनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.