ओएलएक्सवर जाहिरात पाहून चोरांनी कार पळविली; पोलिसांनी ग्राहक बनत परत केली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 07:50 PM2019-08-07T19:50:59+5:302019-08-07T19:54:27+5:30
केरळमधील एका व्यक्तीने त्याची नवीन मॉडेलची स्विफ्ट कार विक्रीस काढली होती.
सध्या ऑनलाईन साईटवर वापरलेल्या गाड्या, मोबाईल विकण्यात येत आहेत. मात्र, याद्वारे फसवणुकीचे प्रकराही वाढले आहेत. केरळमध्ये नवीन घेतलेली कार विकणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले होते. मात्र, पोलिसांनी युक्ती लढविल्याने त्याला कार पुन्हा मिळाली आहे.
केरळमधील एका व्यक्तीने त्याची नवीन मॉडेलची स्विफ्ट कार विक्रीस काढली होती. यासाठी त्याने OLX वर माहिती टाकली होती. चोरांनी या व्यक्तीशी संपर्क साधला आणि गाडी खरेदी करणार असल्याचे सांगितले.
खेरदीच्या बहाण्याने आलेल्या चोरांनी व्यवहार पक्का करण्याआधी कारची टेस्ट ड्राईव्ह करायची असल्याचे सांगितले. तसेच मालकाला कारमध्ये न बसवताच कार घेऊन पसार झाले. यामुळे मालकाने याची तक्रार पोलिसांकडे केली.
चोरांनी लगेचच कारची नंबरप्लेट बदलली तसेच जीपीएसही काढून टाकले. यानंतर चोरांनी ही कार वायनाडच्या एका व्यक्तीला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला कागदपत्रांवरून संशय आला आणि त्याने कारचे मूळ नोंदणी पत्र मिळविले. यानंतर त्याने त्यावरील नंबरवर फोन करत पोलिसांनाही माहिती दिली.
पोलिसांनी शक्कल लढवत या चोरांशी संपर्क साधला. तसेच कार खरेदी करणार असल्याचे सांगितले. ग्राहक बनलेल्या पोलिसांनी त्यांचा पत्ताही वेगळा सांगितला. तसेच कार दाखविण्यासाठी निलेश्वरमला यायला सांगितले. यावर हे दोन्ही चोर ती कार घेऊन निलेश्वरला पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
काही महिन्यांपूर्वी बंगळुरु पोलिसांनीही असाच बाईकचोर पकडला होता. त्याने टेस्ट ड्राईव्ह करण्याच्या बहाण्याने बाईक पळविली होती.