सातारा - केरळ येथील पोलिसांनी शनिवारी साताऱ्यातून येऊन एका दरोडा प्रकरणातील साडेतीन किलो चांदी जप्त केली. केरळ येथील एका बॅंकेमध्ये महिन्यापूर्वी दरोडा टाकून लाखो रुपयांचे सोने चोरीस गेले होते. याप्रकरणी केरळ पोलिसांनी काही दिवसांपूर्वी साताऱ्यात येऊन निखील जोशी (रा. सातारा) याला अटक केली होती. जोशी हाच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. केरळ पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याचा दुसरा साथीदार राहुल घाडगे याच्याकडे सोने, चांदी दिल्याचे सांगितले.
पोलिसांनी राहुल घाडगेला अटक केली. त्याला केरळ येथे नेण्यात आल्यानंतर त्याने साताऱ्यातील एका ज्वेलर्सच्या दुकानात चांदी वितळण्यासाठी दिली असल्याचे सांगितले. त्यामुळे केरळ पोलीस पुन्हा त्याला घेऊन शनिवारी सायंकाळी साताऱ्यात आले. संबंधित ज्वेलर्सच्या दुकानातून पोलिसांनी तब्बल साडेतीन किलो चांदी जप्त केली. यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. केरळ पोलीस साताऱ्यात तळ ठोकून असून, यामध्ये अनेक व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याचे बोलले जातेय.