बापरे! दहावीच्या विद्यार्थिनीने सोशल मीडियावरील मित्राला गिफ्ट म्हणून दिले 75 तोळे सोने; पोलिसही हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 09:59 AM2021-09-07T09:59:13+5:302021-09-07T10:01:06+5:30
Crime News : सोने गायब झाल्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजी हिला अटक करण्यात आली आणि दोघांनाही रिमांडवर घेण्यात आले.
केरळच्या तिरुअनंतपुरम येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील दहावीच्या विद्यार्थिनीने सोशल मीडियावर भेटलेल्या मित्रांना 75 तोळे सोने गिफ्ट म्हणून दिले. एशियानेट न्यूजच्या रिपोर्टनुसार, वर्षभरापूर्वी शिबिन नावाच्या तरूणाने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती, यामध्ये त्याने आर्थिक अडचणीत असल्याचे म्हटले होते. ही पोस्ट पाहून एक 15 वर्षीय विद्यार्थिनी शिबिनसोबत बोलली आणि दोघांत मैत्री झाली.
शिबिनच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिने एक धक्कादायक पाऊल उचलले. विद्यार्थिनीच्या घरात बेडखाली एक गुप्त बॉक्स ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये सोने होते. या विद्यार्थिनीने तिच्या सोशल मीडिया मित्रांना 75 तोळे सोने दिले. त्यानंतर आईच्या मदतीने शिबिनने हे सोने विकले. नंतर शिबिन आणि त्याच्या आईने घराचे नूतनीकरण केले आणि उर्वरित 9.8 लाख रुपये घरात ठेवले.
सोने गायब झाल्यानंतर विद्यार्थिनीच्या आईने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिबीन आणि त्याची आई शाजी हिला अटक करण्यात आली आणि दोघांनाही रिमांडवर घेण्यात आले. विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, तिने एक वर्षापूर्वी शिबीनला सोने दिले होते. पोलिसांनी शिबीनच्या घरातून सुमारे 10 लाख रुपये जप्त केले आहेत. पण, या प्रकरणात एक नवीन वळण आले, ज्यावेळी शिबिनने पोलिसांना सांगितले की, त्याला 75 तोळे सोने मिळाले नाही तर विद्यार्थिनीने फक्त 27 तोळे सोने दिले. त्यामुळे पोलिसही गोंधळलेले आहेत.
विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, 75 तोळे सोन्यापैकी 40 तोळे पलक्कड जिल्ह्यातील दुसऱ्या तरुणाला देण्यात आले, त्याला ती इन्स्टाग्रामद्वारे भेटली. पलक्कड जिल्ह्यातील तरुणाने त्याला सोने मिळताच इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले, पण पोलीस हे स्वीकारायला तयार नाही. आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल, तेव्हाच अधिक माहिती बाहेर येईल असे पोलिसांनी सांगितले.