लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला ठाणे पोलिसांनी अटक केली असताना, रबाळे पोलिसांनीदेखील तिचा ताबा घेण्याची मागणी होऊ लागली आहे. तिच्यावर २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र, तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांकडून आठ महिने तिच्या अटकेत हात आखडता घेतल्याचे तक्रारदार स्वप्नील जगताप यांनी रविवारी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर टीका केल्याप्रकरणी केतकी हिला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात तिच्यावर इतरही दोन ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पवार यांच्यावर टीका होताच तिला तत्काळ कळंबोली येथील राहत्या घरातून अटक केली. मात्र, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्या अटकेबाबत पोलिसांनी हात आखडता घेतल्याची खंत तक्रारदार ॲड. स्वप्नील जगताप यांनी व्यक्त केली. दरम्यान, नेरूळच्या रहिवाशी सुमित्रा पवार यांच्या तक्रारीवरून नेरुळ पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूरज शिंदे फरार घोषित
२०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात जगताप यांच्या तक्रारीवरून केतकी चितळेविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. केतकी व सूरज शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांबद्दल संतापजनक वक्तव्य केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने अटकपूर्व जामिनासाठी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तर सूरज शिंदे नावाच्या व्यक्तीचा शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलिसांनी त्याला फरार घोषित केले आहे.
सप्टेंबर २०२१ मध्ये फेटाळला जामीन अर्ज
न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये केतकीचा अटकपूर्व अर्ज फेटाळल्याने नवी मुंबई पोलिसांकडून तिला अटक होणे अपेक्षित होते. परंतु, तत्कालीन अधिकाऱ्यांनी चालढकल करून आठ महिन्यांपासून तिची अटक टाळल्याचा आरोप तक्रारदार जगताप यांनी केला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या बांधवांकडून रबाले पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.