देवेंद्र पाठक, धुळे: साक्री तालुक्यातील कोंडाईबारी शिवारात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ट्रक पकडला. खैर जातीच्या लाकडाची तस्करी पथकाने पकडली. ट्रक अणि लाकूड असा १० लाख ८७ हजार १४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री करण्यात आली. अंधाराचा फायदा घेऊन चालक आणि सहचालक यांनी ट्रक सोडून पलायन केले.
सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील साक्री तालुक्यातील कोंडाईबारीकडून साक्रीकडे अवैध लाकूड तस्करी करणारा ट्रक कोंडाईबारी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सात किलोमीटर पाठलाग केला आणि एमएच १४ एएच ६५१६ या नंबरचा ट्रक पकडला आहे. या कारवाईमध्ये ट्रकसह १० लाख ८७ हजार १४८ रुपये किमतीचे खैरचे लाकूड व वाहन जप्त करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात वन विभागाच्यावतीने सगळ्यात मोठी कारवाई मानली जात आहे.कोंडाईबारी वन विभागाचे वनाधिकारी सविता सोनवणे व वन कर्मचाऱ्यांसह गुरुवारी मध्यरात्री गस्तीवर होते. गस्त घालत असताना ट्रकमधून लाकडासह काहीतरी जात असल्याचा संशय आला. लागलीच वाहतूक होत असलेला ट्रक वन विभागाच्या पथकाने ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ट्रक थांबायला तयार नाही, यामुळे पथकाने सुमारे ७ किलोमीटरपर्यंत ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला. चालक व सहचालक मात्र अंधाराचा फायदा घेऊन फरार होण्यात यशस्वी ठरले. सदर ट्रकच्या मागील बाजूस तांदळचा तूस (भुसा) भरलेल्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या गोण्यांच्या आतील बाजूस खैर जातीचे लाकूड ट्रकमध्ये भरलेले आढळून आले. ट्रक व खैर जातीचे लाकडासह मुद्देमाल ताब्यात घेतला. लाकडाची किंमत २ लाख ८७ हजार १४८ रुपये आहे तर वाहनांची किंमत अंदाजे ८ लाख रुपये आहे. असा एकूण १० लाख ८७ हजार १४८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी आर. आर. सदगीर, सहायक वनरक्षक डी. आर. अडकिने यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडाईबारी वनपरिक्षेत्र अधिकारी सविता सोनवणे, नीता म्हस्के, गणेश बोरसे, ज्योत्स्ना नांद्रे व इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.