वैभव गायकर
पनवेल - खारघर पोलीस ठाण्यात वीस वर्षीय पत्नीने आपल्या पतीविरोधात ट्रीपल तलाकअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या महिलेशी लग्न करून या पतीने तलाक तलाक तलाक बोलून आपल्याशी काडीमोड केल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नव्याने ट्रिपल तलाकअंतर्गत कायदा पारित केल्याने महिलेच्या तक्रारी वरून खारघर पोलिसांनी ट्रिपल तलाकसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला विज्ञान शाखेत तिसऱ्या वर्षात शिकत आहे. ती खारघर सेक्टर २० मध्ये वास्तव्यास आहे. मागील वर्षी २०१८ मध्ये जून महिन्यात दोघांचे लग्न झाले. मात्र, महिनाभरातच पती सोहेल शेख (२८) व त्याच्या कुटुंबीयांनी फिर्यादी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. एकेदिवशी घरातच फिर्यादी महिलेला एक अल्बम हाती लागला. त्या अल्बममध्ये पती सोहेलचे लग्नाचे जुने फोटो फिर्यादी महिलेच्या नजरेत पडले.यावेळी यासंदर्भात आपल्या पतीला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता. पती सोहेलानी फिर्यादी महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद वाद असाच वाढत गेला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या भांडणात पती सोहेलने तलाक तलाक तलाक असा तीन वेळा उल्लेख करीत तिला तिच्या घरी सोडून दिले. यांनतर देखील पती सोहेल फिर्यादी महिलेला विविध प्रकारचे मेसेज पाठवून अपमानित करत असे.
मध्यंतरी फिर्यादी महिलेला एका अनोळखी महिलेचा फोन आला व माझ्या नवऱ्यापासून दूर रहा अशी धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी महिलेने खारघर पोलीस ठाण्यात धाव घेत खारघर पोलिसांना संबंधित घडलेला प्रकार सांगितला. आरोपी सोहेल शेख हा कुर्ला वास्तव्यास आहे. सोहेलचे एकूण तीन लग्न झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राणे यांनी दिली. आरोपीचा शोध सुरु असून खारघर पोलिसांनी आरोपी सोहेल शेख यांच्याविरोधात फसवणूक, ट्रिपल तलाकअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.