लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे येथील खेरवाडी पोलिस ठाण्यात जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूमला सोमवारी दुपारी आग लागली. या आगीत सहायक पोलिस उपनिरीक्षक अरविंद खोत (५७) यांचा भाजून मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरीत्या उभारण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पोलिस कारवाई करतात. अशाच एका गाडीवर कारवाई करण्यात आल्यानंतर जप्त केलेल्या वस्तू खेरवाडी पोलिस ठाण्याच्या एका स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास स्टोअर रूमला अचानक आग लागली. त्यात खोत ९५ टक्के भाजले. त्यांना आधी सायन रुग्णालयात व नंतर भायखळ्यातील मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून, आम्ही तपास करत आहोत, असे परिमंडळ आठचे पोलिस आयुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.
संशयाचा धूर...पोलिस ठाण्याच्या स्टोअर रूमला आग लागल्यावर अरविंद खोत दरवाजा उघडून बाहेर का आले नाहीत, स्टोअर रूममध्येच का राहिले, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. खोत स्टोअर रूममध्ये एकटेच होते. त्यामुळे किरकोळ आग लागली, तेव्हा खोत बाहेर येऊन आपल्या अन्य सहकाऱ्यांना कळवू शकले असते. मात्र, आग लागल्यावरही स्टोअर रूमचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून खोत यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे स्टोअर रूममध्ये काहीतरी गडबड झाल्याचा आम्हाला संशय असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.