अंबरनाथ - अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीला लागून असलेल्या पालेगाव एमआयडीसी भागात चार दिवसांपूर्वी झालेल्या झायलो आणि रिक्षाच्या भीषण अपघातात जखमी झालेल्या लहर वलेचा या 10 वर्षीय चिमुरडीची अखेर मृत्युशी झुंज अपयशी ठरली आहे. गणेश विसर्जन करून घरी परतत असताना हा अपघात घडला होता. त्या अपघातात कुटुंबातील चार सदस्यांच्या जागीच मृत्यू झाला होता तर लहर ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती.
सायन रूग्णालय येथे चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपचारादरम्यान लहरचा बुधवारी रात्री मृत्यु झाला. या अपघातात उल्हासनगर येथील वलेचा कुटुंबातील दोन महिला आणि दोन लहान मुलांचा मृत्यु झाल्याने वलेचा कुटूंब उध्दवस्त झाले आहे. अंबरनाथ पालेगाव भागात नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या एमआयडीसीच्या परिसरात गणेश विसर्जन करून घरी परतत असलेल्या एका रिक्षाला एका भरधाव झायलो कारने धडक दिली होती. या भीषण अपघातात रिक्षात असलेल्या उल्हासनगर येथील वलेचा कुटूंबातील वर्षा वलेचा (51), आऱती वलेचा (42), राज वलेचा (12) या तीघांचा तर रिक्षा चालक कीशन शिंदे यांचा जागीच मृत्यु झाला होता. तर रिक्षात असलेली वलेचा कुटूंबातील 10 वर्षीय लहर वलेचा ही गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिच्यावर गेले चार दिवस सायन रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी रात्री अखेर लहरचा मृत्यु झाला आहे.
त्यामुळे या अपघातात वलेचा कुटूंबातील सुनिल वलेचा यांची पत्नी आणि लहर या मुलीचा तर जगदीश वलेचा यांच्याही पत्नीचा आणि दिलीप वलेचा यांच्या 12 वर्षीय मुलगा राज यांचा अशा एकाच कुटुंबातील तीन्ही भावांना आपले जीवलग गमवावे लागल्याने या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या प्रकरणी वाहन चालक विनोद यादव याला अटक करण्यात आली आहे.