मंगेश कराळे -नालासोपारा - पोलीस असल्याची बतावणी करत तरुणाचे अपहरण व मारहाण करत वीस हजाराची खंडणी वसूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. पेल्हार पोलिसांनी सोमवारी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी दोन्ही आरोपींना १२ तासांच्या आत गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या दुचाकीसह अटक केले आहे.
पेल्हार गाव येथे राहणारा मोती राम (२०) हा तरुण पेल्हार महामार्गावर वसई ग्रीन नर्सरी जवळून रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास पायी चालत जात होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी थांबवून पोलीस असल्याचे सांगून २० हजाराची मागणी केली. ती देऊ न शकल्यामुळे त्यांनी त्याला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून मुंबई दिशेने दहा किलोमीटर अंतर गेल्यावर त्याला मारहाण करत त्याचा मित्र मोहम्मद ईजराईल याला फोन करून सातीवली येथे पैसे घेऊन येण्यास सांगितले होते. सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांनुसार गुन्हयातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेणेकामी पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे चार वेगवेगळे पथके तयार केले. मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे आरोपींचा शिताफिने शोध घेवुन आरोपी सतिश पवार (३४) आणि योगेश अनिल घाडगे (३०) या दुकलीला १२ तासाचे आत गुन्हा करण्याकरीता वापरलेल्या दुचाकीसह अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार तुकाराम माने, तानाजी चव्हाण, प्रताप पाचुंदे, संदिप शेळके, मोहसिन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, किरण आव्हाड, रोशन पुरकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.