नाशिक : अल्पवयीन मुलीचे ओझर येथून महिलेने अपहरण करत थेट मध्य प्रदेशच्या सीमावर्ती गावात पावणेदाेन लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील लखापूर गावात या अपहृत अल्पवयीन मुलीचा इच्छेविरुद्ध लग्न लावण्याचा डाव पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रामीण पोलिसांसह मध्य प्रदेश पोलिसांच्या पथकावर चाल केली. त्यांचा हल्ला थोपवून धरत पीडित अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली.
ओझर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २३ जुलै रोजी एका १४ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. ओझर परिसरातील महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी तपासले असता एक अनोळखी महिला मुलीला घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिची ओळख पटविली व सापळा रचून सातपूरमधून संशयित प्रियंका देविदास पाटील (रा. कार्बननाका) हिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता तिने शिरपूर येथील तिची मैत्रीण संशयित रत्ना विक्रम कोळी हिच्या मदतीने मुलीचे अपहरण केले होते, अशी कबुली दिली. यानंतर पोलिसांनी संशयित महिला रत्ना कोळी हिला धुळे जिल्ह्यातील शिरपूरमधून ताब्यात घेतले. दोघींनी मिळून १ लाख ७५ हजार रुपये किमतीत अपहृत मुलीला गुजरात येथे लग्नासाठी विक्री केल्याचे सांगितले.
पोलिसांनी या दोघींसह त्यांची मुख्य दलाल जिचे मध्य प्रदेशमध्ये लागेबांधे आहेत, ती संशयित सुरेखाबाई जागो भिला (रा. शिरपूर) हिलाही बेड्या ठोकल्या. या तिघींची पोलिसांनी कसून चौकशी केली. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दोन पथके तयार केली. पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, उपनिरीक्षक जी. ए. जाधव, महिला उपनिरीक्षक अर्चना तोडमल, हवालदार किशोर अहिरराव, विश्वनाथ धारबळ, अनुपम जाधव, रावसाहेब मोरे, राजेंद्र डंबाळे यांचे पथक गुजरातकडे रवाना केले. मुलीची विक्री मध्य प्रदेशमध्ये केली गेली होती. गुजरात येथून पुन्हा पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये दाखल होत मुलीची सुखरूप सुटका केली.
१२ ते १६ वयोगटातील सामान्य कुटुंबातील मुलींना शोधून त्यांना पैसे, नोकरीचे आमिष दाखवत अपहरण करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीपर्यंत ‘ऑपरेशन मुस्कान’ राबवित पोलीस पोहोचले. या महिलांवर यापूर्वीही असे काही गुन्हे आहे का? याबाबत माहिती घेतली जात आहे. या पाचही संशयितांनी संघटितपणे गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. पैशांचे आमिष दाखवून बळजबरीने मुलीचे अपहरण केले व तेथे तिची लग्नासाठी विक्री केली. यामुळे त्यांच्याविरुद्ध अपहरणासह मानव तस्करीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या म्होरक्याचा पोलीस शोध घेत आहेत.- सचिन पाटील, पोलीस अधीक्षक