मुलांनी 'हो' म्हणताच अपहरणकर्त्यांनी त्यांना नदीत फेकलं; जुळ्या भावांच्या हत्येची करूण कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 01:46 PM2019-02-25T13:46:30+5:302019-02-25T13:47:11+5:30
शाळेच्या गणवेशातच या दोघांचे मृतदेह आढळून आले
भोपळ -् मध्य प्रदेशातील चित्रकूट येथून अपहरण करण्यात आलेल्या ५ वर्षांच्या दोन जुळ्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शाळेच्या गणवेशातच या दोघांचे मृतदेह आढळून आले असून पालकांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २० लाखांची खंडणी घेऊनही आरोपींनी त्यांची हत्या करुन जुळ्या भावंडांना यमुना नदीत फेकून दिलं होतं.
उत्तर प्रदेशातील चित्रकूट धाम येथील तेलाचे व्यापारी बृजेश रावत यांच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांचं १२ जानेवारी रोजी अपहरण झालं होतं. दुचाकीस्वारांनी मध्य प्रदेशातील सदगुरु सेवा ट्रस्टच्या शाळेतून हे अपहरण केलं होतं. पोलिसांनी आरोपींकडून खंडणीचे १७.६७ लाख रुपये, दुचाकी आणि कार जप्त केली आहे. जुळ्या भावांच्या हत्येचं वृत्त कळताच मध्यप्रदेश हादरलं आहे. अपहरणकर्त्यांच्या गाडीवर भाजपाचा झेंडा असल्याचं सागंण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाणुनबुजून प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. देवांश आणि प्रियांश अशी या जुळ्या भावांची नावे आहेत. चिमुरड्यांचा मृतदेह सापडला तेव्हा सकाळी घरातून निघताना घातलेल्या शाळेचा गणवेश अद्यापही त्यांच्या अंगावर होता. त्यांचे हात आणि पाय साखळीने बांधण्यात आले होते. दरम्यान याप्रकरणी दोन्ही राज्यांच्या पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप लावण्यात आला आहे. मुलांचा तपास लावण्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील ५०० जवान कार्यरत होते. मात्र तरीही मुलांचा शोध लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अत्यंत हुशारीने काम करत होते. खंडणी मागण्यासाठी आरोपी आपल्या मोबाइल फोनचा वापर करत नसतं. रस्त्यावरुन जाणाऱ्या अनोळखी लोकांना आपल्याला एक महत्त्वाचा फोन करायचा असल्याचं सांगत ते फोन करत होते. इंजिनिअरिंग शिकणारे हे विद्यार्थी एका अॅपच्या सहाय्याने नंबर लपवत असत. यामुळे सायबर पोलीस त्यांना पकडण्यात अपयश येत होतं.
एका पादचाऱ्याला आरोपींच्या बोलण्यावरुन संशय आला आणि त्याने त्यांच्या दुचाकीचा फोटो काढला. पोलिसांशी संपर्क साधून त्याने दुचाकीचा फोटो त्याने दिला. पोलिसांनी तपास केला असता ही दुचाकी रोहित द्विवेदीच्या नावे असल्याचं समोर आलं. रोहित उत्तर प्रदेशातील बबेरु येथील रहिवासी असल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी एक - एक करत सहा आऱोपींना पकडलं. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. २० लाखांची खंडणी घेऊनही आरोपींनी त्यांची हत्या करुन जुळ्या भावंडांना यमुना नदीत फेकून दिलं होतं.
जुळी मुलं आपल्याला ओळखतील याची आरोपींना भीती वाटत होती. २० लाख रुपये मिळाल्यानंतर मुलांना सोडून द्यायचं आरोपींनी ठरवलं होतं. मात्र याआधी त्यांनी मुलांना पोलिसांनी विचारलं तर आम्हाला ओळखणार का असा प्रश्न विचारलं. ज्यावर निरागस चिमुरड्यांनी हो असं उत्तर दिलं. यानंतर अटकेच्या भीतीने घाबरलेल्या आरोपींनी मुलांच्या पाठीला दगड बांधून तसंच साखळीने त्यांचे हात पाय बांधले आणि नदीत फेकून दिलं. आरोपींनी व्हिडीओ गेमच्या आधारे मुलांशी मैत्री करत त्यांना आपल्या ताब्यात ठेवलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली.
उत्तर प्रदेशातील चित्रकूट धाम येथील तेलाचे व्यापारी बृजेश रावत यांच्या पाच वर्षांच्या जुळ्या मुलांचं १२ जानेवारी रोजी अपहरण झालं होतं. दुचाकीस्वारांनी मध्य प्रदेशातील सदगुरु सेवा ट्रस्टच्या शाळेतून हे अपहरण केलं होतं. पोलिसांनी आरोपींकडून खंडणीचे १७.६७ लाख रुपये, दुचाकी आणि कार जप्त केली आहे.
सहा अपहरणकर्त्यांना अटक
गुन्ह्यात सहभागी सहा अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पद्म शुक्ला, लकी सिंह तोमर, रोहित द्विवेदी, रामकेश यादव, पिंटू उर्फ पिंटा यादव अशी या आरोपींची नावे आहेत. रामकेश यादव दोन्ही मुलांची शिकवणी घेत असे. पद्म आणि लकी हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. पद्म याचा भाऊ बजरंग दलात असल्याची माहिती आहे. आरोपींनी बाइक आणि कारचा वापर केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बाइकवर रामराज्य लिहिण्यात आलं होतं, तर कारवर भाजपाचा झेंडा लावण्यात आला होता.
आरोपींनी आधी मुलांना चित्रकूट येथे आरोपी लकीच्या घरी दोन दिवस ठेवलं. एका निर्जनस्थळी हे घर होतं. आरोपी बाहेरुन घर बंद ठेवत होते जेणेकरुन कोणालाही आपण येथे लपलो आहोत याचा संशय येऊ नये. यानंतर त्यांनी मुलांनी उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका भाड्याच्या घरात नेलं. जिथे हत्येच्या आधी काही दिवस मुलांना लपवून ठेवण्यात आलं.