लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. शुक्रवारी पहाटे ही थरारक घडामोड उघड झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सूरज रामभूज शाहू (वय २५) याला अटक केली असून, त्याचा न्यायालयातून चार दिवसांचा पीसीआरही मिळवला आहे.
राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे (वय १५) असे मृत मुलाचे नाव असून, तो एमआयडीसी परिसरातील आझादनगरात राहात होता. त्याचे वडील एका कंपनीत काम करतात. कुटुंबात आई, एक भाऊ, एक बहीण तसेच काका आणि त्यांचा परिवार आहे. आरोपी शाहूच्या कुटुंबात आई आणि त्याच्यासह चार भाऊ आहेत. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, तो फॅब्रिकेटिंगची कामे करतो. तो रायसोनी कॉलेजच्या मागे राहतो. आझादरनगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ते लक्षात आल्यानंतर राज पांडेच्या काकांनी आरोपी शाहूचा पाणउतारा केला होता. मुलीच्या मागे लागल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर मुलीचे लग्न झाले. त्यामुळे आरोपी शाहू राजच्या काकांवर चिडून होता. त्यांच्यावर सूड उगविण्याची तो संधी शोधत होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ६च्या सुमारास १५ वर्षीय राज एसआरपीएफच्या ग्राउंडजवळ दिसताच शाहू त्याच्याजवळ गेला. क्रिकेट सामने सुरू असून, आपण खेळायला जाऊ, असे म्हणून राजला सोबत घेतले. त्याला थेट हुडकेश्वरमधील वंजारी कॉलेजजवळच्या एका निर्जन ठिकाणी नेले. दुचाकीवरून उतरून तो त्याला एका लेआऊटकडे घेऊन गेला. तोवर अंधार पडायला सुरुवात झाली होती. इकडे कुठे क्रिकेटचे ग्राऊंड दिसत नसल्याने राजने आरोपीला भीती वाटत असल्याचे सांगून परत चलण्याचा हट्ट धरला. राजने त्याला समोर केले, अन् मागून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. राज खाली पडताच नंतर त्याला आरोपी शाहूने निर्घृणपणे दगडाने ठेचले. त्यानंतर ब्लेडने त्याच्या हाताच्या नस कापून त्याची हत्या केली.
वेळ गमावला, चूक भोवली
राजचे अपहरण करून त्याला निर्जन ठिकाणी नेल्यानंतर ६.२७ वाजता आरोपीने एका ठिकाणी दुचाकी थांबवली. त्याने राजच्या कुटुंबीयांना फोन केला. राजचे अपहरण केले असून तो सुखरूप पाहिजे असेल तर त्याच्या काकाचे शीर (मुंडके) कापून व्हॉट्सॲपवर फोटो पाठवा, असे आरोपी म्हणाला. अपहरण झाल्याचे आणि अपहरण करणारा माहीत असूनही अपहरणकर्त्या शाहूने राजच्या पालकांकडे भयानक मागणी करूनही ते त्याची समजूत काढत बसले. तो वारंवार फोन करत होता. मात्र, पांडे कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे टाळले. दरम्यान, रात्री ९च्या सुमारास पांडे कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना ते कळविले. अपहरणाचे वृत्त आणि त्याची भयंकर मागणी ऐकून ठाणेदार युवराज हांडे यांनी लगेच वरिष्ठांना कळविले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरूल हसन एमआयडीसीत दाखल झाले. त्यांनी आरोपीला शोधण्यासाठी शहर पोलीस दलातील प्रचंड ताफा कामी लावला. मध्यरात्री आरोपी शाहू बोरखेडीजवळ (बुटीबोरी) पोलिसांच्या हाती लागला.
अनेकांच्या काळजाचे पाणी
त्याला खाक्या दाखविताच त्याने राजच्या हत्येची कबुली दिली. नंतर त्याने पोलिसांना घटनास्थळ दाखवले. वंजारी कॉलेजजवळच्या निर्जन परिसरातून पहाटे २ ते ३ च्या सुमारास पोलिसांनी राजचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेतला. विच्छेदनानंतर राजचा मृतदेह त्याच्या घरी नेला, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी तेथे शोकसंतप्त नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. पांडे कुटुंबीयांचा आक्रोश अनेकांच्या काळजाचे पाणी करणारा होता.