पुणे - व्यापा-याच्या मुलाचे अपहरण करून २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य आरोपीला युनिट १ च्या पोलिसांनी अटक केली आहे.शहाबाज फिरोज खान (रा. भवानी पेठ, चुडामणी चौक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी महेंद्र ओंकारमल निबजिया (रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. खान आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांचा २७ वर्षीय मुलगा दर्शन यांचे अपहरण केले होते. मुलाची सुटका करायची असेल तर २० कोटी रुपयांची खंडणी आरोपींनी मागितली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार यापूर्वी सूरज लक्ष्मण चव्हाण(वय २५, रा. वडकीनाला, हडपसर), अरबाज फिरोज खान (वय २७, रा. भवानी पेठ), फरदीन परवेझ खान (वय १९, रा. कोंढवा खुर्द) आणि साहील अब्दुल शेख (वय २३, रा. मिठानगर कोंढवा) यांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.खान व सुयश वाघमारे हे गुन्हा केल्यापासून फरार होते. पकडले जाऊ नये म्हणून ते आपला ठावठिकाणी सारखा बदलत होते. तसेच अनोळखी व्यक्तींच्या मोबाइलवरून जवळच्या लोकांशी संपर्कात होते. संघटित गुन्हेगारीविरोधी पथक (पश्चिम) गुन्हे शाखाचे अधिकारी व कर्मचारी गुरुवारी (१ नोव्हेंबर) सिंहगड रोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना त्यांच्या खबºयाकडून माहिती मिळाली की, खान हा नांदेड सिटीसमोर येणार आहे. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी त्याला अटक केली.फरार असताना दोन्ही आरोपींनी चोरीचे दोन गुन्हे केले आहेत. त्यांनी १३ आॅक्टोबर रोजी जितेंद्र माली यांच्याजवळील दोन लाख रुपये असलेली बॅग आणि १७ आॅक्टोबर रोजी मनोज राजकुमार केवरामनी यांच्याजवळील ७ लाख रुपये चोरल्याचे कबूल केले आहे. खान यांची न्यायालयाने ४ नोव्हेबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
खंडणीसाठी व्यापाऱ्याचे मुलाचे अपहरण; मुख्य आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 1:31 AM