Auraiya child kidnapping Case: यूपीमधील औरियातून अपहरण, खुन आणि एनकाउंटरचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 13 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी त्याला ट्रॉली बॅगमध्ये भरले आणि बॅग गाडीच्या डिक्कीत ठेवली. मात्र, पोलीस त्या मुलापर्यंत पोहोचण्यापूर्वीच गुदमरुन त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर यूपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत सर्व आठ आरोपींच्या पायाला गोळ्या लागल्या.
या घटनेत अवधेश कुमार, दीपक गुप्ता, अंकित, शोभन यादव, जतिन दिवाकर, रवी, आशिष आणि रियाझ उर्फ मुन्ना अशी गोळ्या लागलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. या सर्व आठ जणांच्या उजव्या किंवा डाव्या पायाला गोळी लागली आहे. पाय सोडून शरीरावर इतर कुठेही दुखापत झालेली नाही. तसेच त्याच्या शरीरावरही जखमेच्या खुणा नाहीत.
23 मार्च रोजी मुलगा घरातून बेपत्ता सविस्तर माहिती अशी की, सराफा व्यावसायिक शकील यूपीच्या औरैया जिल्ह्यातील एरवा कटरा येथे आपल्या कुटुंबासह राहतात. होळीच्या दोन दिवस अगोदर, म्हणजेच 23 मार्च रोजी शकीलचा 13 वर्षांचा मुलगा सुभान मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, यानंतर त्याच्या वडिलांनी शनिवारी रात्रीच पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी मुलगा बेपत्ता झाला, त्याच दिवशी घराशेजारी राहणारा रियाज उर्फ मुन्नाही घरातून बेपत्ता झाला होता. यामुळे संशयाची सुऊ मुन्नाकडे वळली.
ट्रॉली बॅगमध्ये सुभानचा मृत्यू पोलिसांना तपासादरम्यान समजले की, मुन्नासोबत त्याचे अन्य तीन मित्रही घरातून बेपत्ता झाले आहेत. यानंतर मुन्ना आणि त्याच्या तीन मित्रांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असता, ते दिल्लीकडे जात असल्याची माहती मिळाली. यानंतर औरैया पोलिसांनी आधी नोएडा पोलिसांशी आणि नंतर दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. मुन्ना सतत चार लोकांशी फोनवर बोलत असल्याचे समजले. हे चौघेही दिल्लीतील कुख्यात गुन्हेगार आहेत. औरैया पोलिसांनी हे इनपुट दिल्ली पोलिसांशी शेअर केले. यानंतर औरैया पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींना सुभानविषयी विचारले असता, त्याला डिक्कीत बंद केल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी डिक्की उघडली, पण तोपर्यंत सुभानचा गुदमरुन मृत्यू झाला होता.
आरोपींच्या पायावर गोळी...सोमवारी पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी सर्व आरोपींना घेऊन एरवा कटरा जंगल गाठले. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांनीही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी सर्व आठ आरोपींच्या पायावर गोळी लागली. या घटनेत काही पोलिसही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.