बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली इथं हैराण करणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी दीड महिन्यापूर्वी एका हिंदू युवकासोबत विवाह करणारी खुशबू बानो या महिलेचं तिच्याच घरच्यांनी अपहरण केले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी खुशबूच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस खुशबूच्या घरच्यांचा शोध घेत आहेत.
खूशबूचा पती विशालनं तक्रारीत म्हटलंय की, दीड महिन्यापूर्वी भदोही इथं राहणाऱ्या खुशबूने तिच्या स्वच्छेने इस्लाम धर्म त्याग करून सनातन धर्म स्वीकारला होता. हिंदू प्रथेनुसार आमचे लग्न पार पडले. अगस्त मुनी आश्रमच्या पंडित केके शंखधार यांनी विधी संपन्न केले. खुशबूसोबत माझी मैत्री फेसबुकवर झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. ऑक्टोबर महिन्यात खुशबूला भेटण्यासाठी मी बरेलीला गेलो होतो. अगस्त मुनी आश्रमला जाऊन पंडित केके शंखधार यांच्यासमोर धर्म परिवर्तन केले होते.
त्यानंतर या दोघांनी लग्न केले. सनातन धर्म स्वीकारल्यानंतर खुशबूने तिचे नाव बदलून खुशबू सक्सेना केले. त्यावेळी खुशबूने मी संपूर्ण आयुष्य हिंदू बनून राहीन असं म्हणत लहानपणापासून मला हिंदू धर्माशी आस्था होती. परंतु काही लोकांमुळे मला धर्म परिवर्तन करता येत नव्हते. हिंदू धर्म स्वीकारल्यामुळे मला ३ तलाक आणि हलालासारख्या क्रूर प्रथेपासून मुक्ती मिळाली असं तिने म्हटलं होते.
दरम्यान, खुशबूचे अपहरण करण्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या व्हिडिओत खुशबूच्या घरचे बळजबरीने घरात घुसून आणि तिला ऑटोमधून पळवून घेऊन गेले. विशालने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा खुशबूचा पती कामावर गेला होता. खुशबूचे सासू सासरेही घरात नव्हते. घरात खुशबू आणि तिची वहिणी जी आजारी आहे या दोघीच होत्या. अशावेळी विशालच्या सासरच्यांनी खुशबूचे अपहरण केले.