नवी मुंबई : शाहरूख खानच्या अलिबाग येथील फार्म हाउसवरील सुरक्षारक्षकाचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. घणसोली परिसरातील गुंडांनी पूर्ववैमनस्यातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मुंब्र्यालगत त्यांच्या हत्येचा कट रचला जात असतानाच, स्वतःची सुटका करून घेतल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.घणसोली गावात राहणाऱ्या सुशांत पाडी (४१) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या अलिबाग येथील फार्म हाऊसवर ते सुरक्षारक्षकाची नोकरी करतात. गुरुवारी रात्री ते घणसोली गावातून पायी चालले असताना, दबा धरून बसलेल्या सागर ढोणेने त्यांच्या गळ्याला चाकू लावून कारमध्ये कोंबले. यावेळी कारमध्ये अगोदरच बसलेल्या एकाने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, पाडी यांचे अपहरण करून मुंब्रा परिसरात नेण्यात आले. त्या ठिकाणी तिघे जण पाडी यांची हत्या करून, विल्हेवाट लावण्याचा कट रचत असतानाच, त्यांनी स्वतःची सुटका करून तिथून पळ काढला. त्यानंतर त्यांनी रिक्षाचालकाची मदत घेत घणसोली गाठली. रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असून, सागर ढोणे व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहरूख खानच्या फार्म हाउसच्या सुरक्षारक्षकाचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 1:00 AM