अमरावती : जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना त्यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील कामगिरीकरिता पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहे.गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) या पदावर कार्यरत असताना हरी बालाजी एन. यांनी नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी स्थापन झालेल्या सी-६० विशेष कमांडो पोलीस दलाची कमान सांभाळली. १९ नोव्हेंबर २०१८ रोजी निहायकल जंगल परिसरात नक्षल्यांशी झालेल्या चकमकीत खून, जाळपोळ या सारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पोलीेस शौर्यपदक प्रदान केले जाणार आहे.
३४ चकमकींमध्ये ७४ नक्षलवाद्यांना कंठस्नान
गडचिरोलीतील नियुक्तीदरम्यान हरी बालाजी एन. यांनी अडीच वर्षाच्या कार्यकाळात ३४ चकमकींदरम्यान एकूण ७४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात भूमिका निर्णायक ठरली. याशिवाय नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाची आत्मसमर्पण योजनाही त्यांनी प्रभावीपणे राबविली.
चमकीनंतर शस्त्र जप्त
हरी बालाजी एन. यांच्या नेतृत्वातील पथकाने ८ एमएम रायफल, चार जिवंत काडतूस ४, १२ बोअर रायफल, ११ जिवंत काडतूस, १२ नग ३०३ चे जिवंत काडतूस, तीन किलोचा क्लेमोर बॉम्ब, चार किलोचे कूकर बॉम्ब , पिट्टू, नक्षल साहित्य जप्त केले होते.