लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शिवसेनेचे मुखेड (जि. नांदेड) तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर पाटील, पुणे येथील बांधकाम व्यावसायिक फैजल खान यांच्यासह तिघांची सुपारी घेऊन हत्या करणारा कुख्यात गुन्हेगार भरत विठ्ठल एडके (वय ३९, रा. भाईंदर, जि. ठाणे) याला पकडण्यात अहमदनगरच्या पोलिसांना यश आले आहे. एडके याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोथरुड (पुणे) येथून अटक केली. तो आठ वर्षांपासून फरार होता.
एडके याला अटक झाल्यानंतर सोमवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, एडके यांच्याविरोधात मीरारोड (मुंबई), भाईंदर (ठाणे), पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, श्रीगोंदा तालुक्यात खून आणि दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. एडके याने सुपारी घेऊन शिवसेनेचे मुखेड तालुका प्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांची जामखेड-बीड हद्दीवर हत्या केली होती. तसेच पुणे येथील बांधकाम व्यावसायिक फैजल खान यांना ६५ एकर जमिनीच्या वादामधून सुपारी घेऊन ठार मारले होते. तर बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथील आकाश मापारी यांचे अपहरण करून खून केला होता. त्याच्यावर मीरारोड, भाईंदर, पुणे व अहमदनगर येथे खून, दरोड्यासह खून, अपहरण, जबरी चोरी, मारहाण, अवैध शस्त्र बाळगणे असे १० गंभीर गुन्हे नोंद आहेत. मात्र तो पोलिसांच्या हातावर तुरी करून फरार होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने एडके याला अटक केली. कटके यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश इंगळे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाने, देवेंद्र शेलार, भीमराज खर्से, सुरेश माळी, रवी सोनटक्के यांना भरत एडके हा कोथरुड येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सापळा रचून एडके यास ताब्यात घेतले. एकडे हा सुपारी घेऊन खून करणारा सराईत गुन्हेगार असून तो ८ वर्षांपासून फरार होता. पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करून त्याला पकडले आहे. त्यामुळे पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले