लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: पाणी भरलेल्या बादलीत तोंड बुडवून मारी सिलिन विल्फ्रेड डीकोस्टा (६९) या महिलेची हत्या करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून घरात केअर टेकर कम मोलकरणीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हत्या प्रकरणी मालाड पोलिसांनी शबनम परवीन शेख, तिचा मुलगा शहजाद आणि त्यांचा साथीदार मोहम्मद उमेर शेख (७१) या तिघांना अटक केली आहे. मायलेकाकडे कसून चौकशी करत तांत्रिक तपासाच्या माध्यमातून मोहम्मदच्या मुसक्या त्यांनी वसई विरार परिसरातून आवळल्या. तिन्ही आरोपींना २६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र अडाणे यांनी सांगितले.
मालाड पश्चिमच्या न्यू लाईफ सीएचएसमध्ये डीकोस्टा या राहत होत्या. त्यांचा नातू नील रायबोले (२६) हा त्याच्या वडिलांशी पटत नसल्याने डीकोस्टा यांच्यासोबतच राहायचा. जो बीकेसीमध्ये ड्रीम इलेव्हन या कंपनीत कामावर आहे. डीकोस्टा या खासगी कंपनीतून निवृत्त झाल्या. त्या भाजी आणायला किंवा चर्चमध्ये जाण्यासाठी बाहेर पडायच्या. घरकामासाठी शबनम परविन शेख हिला १९९६-९७ मध्ये डीकोस्टा यांचे पती विल्फ्रेड त्यांनी नोकरीवर ठेवले. रायबोलेला २०१९ मध्ये बंगळुरू येथे काम मिळाल्याने डीकोस्टाची काळजी घेण्यासाठी कायमस्वरूपी मोलकरीण म्हणून शेख हिला ठेवण्यात आले. ती दोन वेळेस जेवण बनवणे, घराची साफसफाई करणे, कपडे धुणे, डीकोस्टांना मसाज करणे अशी कामे करायची. २०२० मध्ये ती गोव्याला गेली आणि २०२२ मध्ये पुन्हा कामावर आली. पतीने सोडल्यावर एका पायाने अपंग असलेली शेख भाडे तत्त्वावर मुलांसोबत राहत होती.
डीकोस्टा फोन उचलत नव्हत्या... रायबोले याचे लर्निंग लायसन्स बनविण्यासाठी सुरेश नामक एजंटने त्याला फोन केला आणि लायसन्स ऑथेंटिकेशनसाठी मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला. तो नंबर डीकोस्टा यांच्याकडून घ्यायला सांगितल्यावर का फोन उचलत नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे रायबोले याने स्वतः आजीला फोन केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. तेव्हा तिच्या मेरी नामक मैत्रिणीला फोन करत, घरी जाण्यास सांगितले. मेरी यांनी घरात जाऊन पाहिल्यावर बाथरूममधील बादलीत तोंड बुडून बेशुद्ध अवस्थेत डीकोस्टा त्यांना दिसल्या आणि शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
सीसीटीव्हीमुळे प्रकार उघडकीसडिकोस्टा यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, त्यांचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवला. तर रायबोले यांनी राहत्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीसीटीव्ही फुटेज पाहिले. ज्यात शेख व शहजाद बाहेर पडले आणि त्याचवेळी मास्क लावलेला व पाठीवर सॅक असलेला अनोळखी इसम त्यांच्या घरात शिरला.