मुंबई : ओव्हरटेक केल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला जाब विचारणाऱ्या आकाश माईन (२८) या दुचाकीस्वाराला काही जणांनी बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, याप्रकरणी हल्लेखोरांपैकी अजून एक मयांक वर्मा याचाही गाशा गुंडाळण्यात पोलिसांना यश आले आहे. तो मालाड पूर्वचा राहणारा असून बेरोजगार आहे. त्यामुळे आरोपींची संख्या १० झाली आहे.
आकाश यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अविनाश कदम (ऑटोचालक), अमित विश्वकर्मा, आदित्य सिंग, जयप्रकाश आमटे, राकेश ढगले, साहिल कदम, अक्षय पवार ऊर्फ लिंबू, प्रतीकेश सुर्वे तसेच वैभव सावंत यांना अटक करत स्थानिक न्यायालयात हजर केले. तेव्हा त्यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सर्व आरोपींवर दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी आकाशची पत्नी अनुश्री (३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, शनिवारी संध्याकाळी पुष्पापार्क दप्तरी रोडवरून आकाशच्या पालकांना भेटायला ते स्कूटरवरून निघाले होते. त्यावेळी ऑटो रिक्षाचालक अविनाश याने आकाशच्या गाडीला ओव्हरटेक केले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.