लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने नातेवाईकांनीच एका गॅस मेकॅनिकची हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये घडली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासांतच तिघांना बेड्या ठोकल्या.
बदलापूर पश्चिमेच्या वडवली चौकात श्रवणकुमार बिष्णोई आणि प्रकाश बिष्णोई हे एकाच घरात राहत होते. हे दोघेही एका गॅस एजन्सीत मेकॅनिक म्हणून काम करत होते. श्रवणकुमार याने प्रकाश याचा सोलापूर येथे राहणारा भाऊ बुधाजी बिष्णोई याला काही उसने पैसे दिले होते. हे पैसे तो परत करत नसल्याने श्रवणकुमारने बुधाजी याला फोनवरून शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजता बुधाजी बिष्णोई याने त्याचा भाऊ प्रकाश आणि साथीदार दिनेश बिष्णोई यांना सोबत घेऊन श्रवणकुमारचे घर गाठले. तिथे त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याचा गळा दाबून खून केला आणि त्याचा मृतदेह तिथेच टाकून पळून गेले. हे तिघेही पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.
वैद्यकीय अहवालात श्रवणकुमारची हत्या झाल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तांत्रिक तपास करत पोलिसांनी बुधाजी बिष्णोई, प्रकाश बिष्णोई आणि दिनेश बिष्णोई यांना काही तासांतच बेड्या ठोकल्या, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.