भुसावळ : भुसावळ शहरात घरफोडीसह खुनाची मालिका सुरू आहे, एकाच्या डोक्यात दगड टाकून खून करण्यात आल्याची घटना आगवाली चाळ परिसरात शनिवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. यात एकास ताब्यात घेण्यात आले आहे. सुनील अरूण इंगळे असे या मयत इसमाचे नाव आहे.
लॉकडाऊनमध्ये शहरात खुनाची ही घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खून प्रकरणी सुनील याचा मित्र शहबाज शहा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पोलीस चौकी क्रमांक ७ बाजूला ही घटना घडली. सुनील इंगळे याचा गळा व डोक्यावर दगड व धारदार शस्त्राच्या साहाय्याने वार करून खून केला व का खड्ड्यात मृतदेह टाकून दिला. कुणालाही संशय नको म्हणून त्यावर सिमेंटच्या पत्रा झाकून दिला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. खुनाची ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या १५ दिवसापूर्वीही एकाच खून करण्यात आल्याची घटना भुसावळात घडली होती. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्यासह पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी लागलीच पंचनामा सुरु केला होता.